लॉकडाउनने भट्टीच पेटली नाही; कुंभार व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

कृष्णा पिंगळे
Tuesday, 12 May 2020

भर उन्हाच्या काहिलीत माठातील थंडगार पाणी पिण्याचा सुखद अनुभव या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नशिबी आलाच नाही. यामुळे मात्र, कुंभार व्यावसायिकांचे त्यांच्या भट्ट्याच पेटवता आल्या नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सोनपेठ (जि. परभणी) : भर उन्हाच्या काहिलीत माठातील थंडगार पाणी पिण्याचा सुखद अनुभव या लॉकडाउनमुळे अनेकांच्या नशिबी आलाच नाही. यामुळे मात्र, कुंभार व्यावसायिकांचे त्यांच्या भट्ट्याच पेटवता आल्या नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरवातीला प्रत्येक बाजारात किंवा रस्त्याच्या कडेला माठ, रांजण, सुरई, कोथळी आदी रचून ठेवलेले चित्र असते. ‘गरिबांचा फ्रीज’ अशी ओळख असलेल्या माठाला उन्हाळ्यात प्रचंड मागणी असते. सोनपेठ तालुक्यात मोजकीच कुटुंबे या परंपरागत व्यवसायात अजूनही टिकून आहेत.
मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे हा व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला आहे. कुंभार कुटुंबीय दर आठवड्याला भट्टी लावते. या भट्टीत पन्नास ते साठ माठ, दहा ते बारा कोथळ्या, मातीच्या चुली, बिंगी, कळशी, बुटके, झाकण्या आदी दहा ते पंधरा हजारांचा माल तयार केला जातो.

हेही वाचा : वाळू उपशावर छापा; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त 

 एका आठवड्यात साधारण एक ते दोन भट्ट्या निघतात. माती तयार करणे, चिखल तयार करून भांडे, माठ, रांजण तयार करणे व भट्टी लावून तयार झालेला माल आठवडे बाजारात विक्री करणे हा त्यांचा व्यवसाय. परंतु, गेल्या आठ आठवड्यांपासून आठवडे बाजारच बंद असल्यामुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात माठाना मोठी मागणी असते. दीड ते दोन हजार माठ, तर पाचशे ते सहाशे कोथळ्या उन्हाळ्यात विक्री होत असतात. परंतु, या वर्षी काही मोजकेच माठ विक्री झाले. अक्षयतृतीयेच्या सणाला पूर्वजांच्या स्मृतिप्रित्यर्थ कलश दानाची मोठी परंपरा हिंदू संस्कृतीत आहे. या वर्षी लॉकडाउनमुळे तयार केलेला माल विक्रीअभावी घरातच पडून आहे. लॉकडाउनमुळे या व्यवसायासाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होत नसल्यामुळे या लॉकडाउनमध्ये कुंभारांणी भट्टी पेटवलीच नाही, असे  व्यावसायिक लहू कुंभार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा व पहा  : Video : शंक्या...! काहीही व्हायलय बे हे....; अभिनेता संकर्षण यांची परभणी तडका कविता

नव्या पिढीची व्यावसायाकडे पाठ
कोरोनामुळे डॉक्टरांनी नागरिकांना फ्रीजचे पाणी न पिण्याबद्दल सूचना दिल्याने नागरिकांना नाईलाजास्तव साध्या पाण्यानेच आपली तहान भागवावी लागत आहे.  कुंभारकाम हे अतिशय मेहनतीचे व कलाकुसरीचे काम आहे. घेतलेल्या मेहनतीचा पुरेपूर मोबदला या व्यवसायातून मिळत नसल्यामुळे कुंभार समाजातील नवी पिढी या परंपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवत आहे. 

 

उपासमारीची वेळ
दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर माठ विक्री करून मिळणाऱ्या पैशांवर वर्षभर प्रपंच चालवतो. परंतु, या वर्षी लॉकडाउनमुळे कुठलाच व्यवसाय न झाल्याने उपासमारीची वेळ आलेली आहे. 
- अनिता कुंभार, व्यावसायिक, सोनपेठ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown costs businesses millions Parbhani News