Lockdown : उस्मानाबादमध्ये कडक संचारबंदी, रस्त्यांवर शुकशुकाट

सयाजी शेळके 
सोमवार, 13 जुलै 2020

शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरही शुकशुकाट दिसत होता. रोज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान सर्व दुकाने उघडतात. सोमवारी सकाळी मात्र बहुतांश दुकानांचे शटर बंद असल्याचे चित्र होते.

उस्मानाबाद  : शहरात सोमवारी (ता. १३) संचारबंदी लागू केल्यानंतर प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. नागरिकांनीही घरातच राहणे पसंत केल्याचे चित्र दिवसभर होते.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. त्यात आता शहरात संचारबंदीचा प्रयोग केला जात आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्याही झपाट्याने वाढत आहे.

रोज पाच ते सात रुग्ण आढळून येत आहेत. शहराच्या विविध भागांत रुग्ण आढळून येत असल्याने यावर नियंत्रण ठेवण्याची सर्वच स्तरांवरून मागणी केली जात होती. नागरिकांनी यासंदर्भात नगरसेवकांकडे मागणी केली होती. सर्वच बाजूने लॉकडाउनची मागणी वाढली होती. पालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून संचारबंदी
लागू केली आहे. सकाळी संचारबंदी सुरू झाल्याने फिरायला जाणाऱ्यांची संख्याही कमी दिसत होती. त्यानंतर आठच्या दरम्यान रस्त्यावर तुरळक वाहने पाहायला मिळत होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप 

प्रमुख रस्त्यावरही तुरळक वाहतूक सुरू होती. काही दुचाकीस्वार रस्त्यावर दिसून येत होते. काही मोटारीही भरधाव वेगाने जात होत्या. मोठी वाहने मात्र रस्त्यावर दिसून येत नव्हती. शहराच्या अंतर्गत रस्त्यांवरही शुकशुकाट दिसत होता. रोज सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान सर्व दुकाने उघडतात. सोमवारी सकाळी मात्र बहुतांश दुकानांचे शटर बंद असल्याचे चित्र होते.

शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही शुकशुकाट होता. अनेक रस्ते ओस पडले होते. गजबजलेला नेहरू चौक, शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जिजाऊ चौक, देशपांडे स्टँड अशा विविध भागांत वाहनांची तुरळक ये-जा सुरू होती. त्यामुळे शहरात संचारबंदीला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. यातून शहरात होणारा कोरोनाचा
संसर्ग रोखला जावा, अशी अपेक्षा आहे. आता हीच संचारबंदी पुढील रविवारपर्यंत सुरू राहणार आहे. 
 
अत्यावश्यक सेवांना सूट 
शहरात संचारबंदी सुरू असली तरी अत्यावश्यक सेवा मात्र सुरू होत्या. त्यामध्ये किराणा दुकाने, भाजीपाला, दूध विक्रेते, औषध दुकाने अशाप्रकारच्या सेवा सुरू होत्या, तर हार्डवेअर, ज्वेलरी, इलेक्ट्रिक साहित्य आदी सेवा बंद होत्या. 
  
किराणा दुकाने दोन वाजेपर्यंतच राहणार सुरू 
उस्मानाबाद शहरातील किराणा दुकाने दुपारी दोनपर्यंत सुरू राहणार आहेत. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. शहरात सोमवारपासून (ता. १३) संचारबंदी लागू केली. या आदेशाचे शहरातील सर्व किराणा दुकानदारांनी पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले. 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown in Osmanabad city