Video-लॉकडाउन : ऐन हंगामात कुंभार व्यावसायिक अडचणीत, कसे? ते वाचा

प्रमोद चौधरी
Friday, 24 April 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह संपूर्ण देश लाॅकडाउन केला आहे. परिणामी बाजारपेठ बंद आहे, वाहतूक व्यवस्था बंद आहे. रस्तेही थांबले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असून, सर्वप्रकारच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातून कुंभार व्यावसायिकही सुटलेले नाहीत.

नांदेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाउनमुळे ठप्प झालेल्या व्यवहाराचा फटका आता कुंभार व्यावसायिकांनाही बसत आहे. ऐन उन्हाळ्यात कुंभार बांधवांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. घरासमोरील तसेच विक्रीसाठी फुटपाथवर पडलेला माठांचा ढिगारा त्यांच्या चिंतेत वाढ करत आहे. उन्हाळा तसेच अक्षयतृतीयेमुळे गरिबांचा फ्रीज समजल्या जाणाऱ्या माठांना सध्या मोठी मागणी असूनही विक्री होत नाही, अशी विचित्र अवस्था आल्याने कुंभार व्यावसायिक अडचणित सापडले आहेत. 

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशावेळी प्रत्येकाला थंड पाण्याची आवश्यकता भासते. माठाला गरीबांचा फ्रिज म्हणूनच ओळखले जाते. मात्र कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लाॅकडाउन झाल्यामुळे असंख्य कुंभार बांधवांनी तयार केलेले रांजन, माठ आदी वस्तू या घरातच पडून आहेत. कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाउन व संचारबंदीमुळे माल तयार आहे; मात्र विक्रीस नेता येत नसल्यामुळे यासाठी लागलेला खर्चही निघतो की नाही, अशी परिस्थिती आजरोजी निर्माण झाली आहे.

हेही वाचा - बांधकाम व्यवसायही डबघाईला

वर्षभर प्रपंचाचा गाडा कसा चालवायचा?
उन्हाळ्याच्या दिवसात माठ, रांजन व विशेषतः अक्षय तृतीयेनिमित्त लागणाऱ्या घागरी विकून कुंभार बांधव वर्षभराचा आपल्या प्रपंचाचा गाडा ओढतात. मात्र, ऐन उन्हाळ्याच्या दिवसात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लाॅकडाउन व संचारबंदी असल्याने त्यांनी बनवून ठेवलेला माल घरात पडून आहे. तर काहींनी स्वतःच्या वाहनाने विक्रीसाठी आणला, पण ग्राहकच नाही. त्यामुळे बनविलेला माल विकल्या जाईल की नाही? की ही परिस्थिती अशीच राहील? अशा विवंचनेत आज कुंभार बांधव अडकला आहे.  माल जर विकल्या नाही गेला तर वर्षभर प्रपंचाचा गाडा कसा चालवायचा? असा प्रश्न त्यांना सतावू लागला आहे.

हे देखील वाचाच - Video : सावधान...वजिराबाद चौरस्त्यावर अवतरला यम

अक्षयतृतीयेला आहे महत्त्व
हिंदू समाजामध्ये अक्षयतृतीयेला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी ज्यांचे आई वडील मृत असतील त्यांना जेऊ घालतात. यासाठी कुंभाराने घडविलेली घागरीची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे जवळपास प्रत्येकाच्याच घरी घागरीची आवश्यकता असते. मात्र यावर्षी कोरोनाच्या अनुषंगाने लाॅकडाउन सुरु असल्यानेच अक्षयतृतीयेला अवघे दोन दिवस बाकी असतानाही घागरी घेण्यास अद्यापही ग्राहक फिरकताना दिसत नाही. तर शहरातील अनेक रस्ते बंद असल्याने अक्षयतृतीयेला आवश्यक असलेली घागर आणावी कोठून? असा प्रश्न नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown: Potter business in trouble during season Nanded News