जालनेकरांनो, आता तरी घरात बसा!

उमेश वाघमारे
सोमवार, 6 एप्रिल 2020

शहरात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण, लॉकडाऊनचे पालन होणे गरजेचे 

जालना - देशभरात कोरोनाचा विळखा वाढत आहे; मात्र जालन्यात रस्त्यांवरील गर्दी कमी होण्यास तयार नाही. त्यात सोमवारी (ता. सहा) शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. त्यामुळे जालनेकरांनो आता तरी घरात बसा, कारण कोरोना दारात आला आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकाडाऊन लागू करण्यात आले आहे; मात्र नागरिक या लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. ‘साहेब, मेडिकलवर निघालो आहे,’ ‘किराणा आणण्यास निघालो आहे,’ ‘भाजीपाला आणण्यास निघालो आहे,’ अशी कारणे देत शहरात दुचाकीस्वार संचारबंदीत मुक्तसंचार करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी अशा मोकाट फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करून, लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हेही दाखल केले आहेत; मात्र तरीही जालनेकर घरात बसण्यास तयार नाहीत, असे चित्र आहे; पण आता कोरोना विषाणू जालनेकरांच्या दारात येऊन ठेपला आहे.

सोमवारी (ता. सहा) शहरातील एक महिला कोरोनाबाधित आढळून आली आहे. त्यामुळे आता जालनेकरांनी घरात बसून राहणे अपेक्षित आहे. कारण नागरिकांनी विनाकारण गर्दी केल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे आता जालनेकरांनी प्रशासनाला सहकार्य करून घरात बसणे गरजेचे आहे; अन्यथा दारात असलेला कोरोनाचा विषाणू घरात येण्यास वेळ लागणार नाही. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
 
येथे आहे सतत नागरिकांची रेलचेल 
संचारबंदी सुरू लागू झाल्यानंतरही शहरातील नागरिकांची गर्दी कमी होण्यास तयार नाही. जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाकडून सतत आवाहन करूनही नागरिक घरात बसण्यास तयार नाहीत. त्यात शहरातील विविध भागांतील भाजीपाला मार्केट, किराणा दुकान येथे सतत नागरिकांची रेलचेल सुरू असते. त्यामुळे येथील गर्दी कमी होणे अपेक्षित आहे.  

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown status in Jalna