वीजपुरवठा वारंवार खंडीत, शेतकऱ्यांनी ठोकले उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे

नीळकंठ कांबळे
Wednesday, 27 January 2021

खंडित वीजपुरवठा सुरळी करण्याच्या मागणीसाठी उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

लोहारा (जि. उस्मानाबाद):  लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा मागील दोन महिन्यापासून खंडित झाला आहे. वीजवितरण कंपनीकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याची वेळोवेळी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी (ता.२७) सकाळी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयास टाळे ठोकून रोष व्यक्त केला. 

लोहारा शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर सुमारे आठ हजार लोक संख्याचं हिप्परगा गाव आहे. येथे बहुसंख्येने शेतकरीवर्ग आहे. कृषिपंपासाठी वीजपुरवठा करण्यासाठी लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीने स्वतंत्र फिडरची व्यवस्था करून ६८ रोहित्र बसवले आहेत. परंतु या फिडरवरूनच इतर तीन गावांच्या कृषिपंपांना वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे फिडरवर अतिरिक्त भार पडत असल्याने सतत रोहित्र नादुरूस्त होणे, तांत्रिक बिघाड होणे असे प्रकार नित्याचे झाली आहेत. त्यामुळे गेली काही वर्षापासून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच मागील दोन महिन्यापासून परिसरातील वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.

पंकजा मुंडेंच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांचे उपोषण मागे, प्रशासनाला दिल्या कारवाईच्या सूचना

यंदा परतीचा दमदार पाऊस झाल्याने परिसरातील विंधन विहीर, विहिरी, नदींना मुबलक पाणी उपलब्ध आहे. उपलब्ध पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, ज्वारी, करडई आदी पिके घेतली आहेत. वातावरण पोषक असल्याने शिवार बहरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या उत्पादनाची आशा असतानाच दोन महिन्यापासून वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी असतानाही विजेअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. वीजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता वाढली आहे.

येथील शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत वीजवितरण कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी, तोंडी  तक्रारी केल्या आहेत. परंतु तक्रारीची दखल घेतली नसल्याने हिप्परगा येथील संतप्त शेतकऱ्यांनी अखेर बुधवारी सकाळी पाऊणे अकराच्या सुमारास लोहारा उपविभागीय वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य इंद्रजित लोमटे, माजी सरपंच विजय लोमटे, धरमविर जाधव, नारायण क्षीरसागर, जीवन होनाळकर, विनोद मोरे, संजय नरगाळे, अनिल आतनुरे, उमेश गिराम, मनोज गवळी, तानाजी नरगाळे, ज्ञानेश्वर मोरे यांच्यासह सुमारे दीडशे शेतकरी उपस्थित होते.

औरंगाबादच्या बेगम यांची तब्बल १८ वर्षानंतर पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका; नातेवाईकांनी मानले पोलिसांचे आभार

वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करीत शेतकऱ्यांनी वीजवितरण कार्यालयास टाळे ठोकून सुमारे तीन तास आंदोलन केले. टाळे उघडणारच नाही, असा आक्रमक पवित्रा शेकऱ्यांनी घेतल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांना पाचारण केल्यानंतर तणाव निवळला. वीजवितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता आर. एस. दीक्षीत यांनी सलग आठतास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आश्वान दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lohara breaking news farmers locked the office of the sub divisional power distribution company