विषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र

lohara nagar panchayat
lohara nagar panchayat

लोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली. यात अर्थ व बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गगन माळवदकर, आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापतिपदी काँग्रेसचे श्रीनिवास फुलसुंदर, महिला व बालकल्याण सभापतिपदी शिवसेनेच्या कमल भरारे, तर सार्वजनिक पाणीपुरवठा सभापतिपदी सेनेचे गटनेते अभिमान खराडे यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. या निवडीदरम्यान सत्ताधारी व विरोधक एकत्र आल्याने नवीन राजकीय समिकरण जुळून आल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

नगरपंचायतच्या स्थायी समिती व विषय समिती सभापती, सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्यासाठी नगरपंचायतच्या सभागृहात गुरूवारी सकाळी अकरा वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार प्रभारी तहसीलदार रोहन काळे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी गजानन शिंदे, नगराध्यक्षा ज्योती मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मागील दीड वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीदरम्यान बंडखोर शिवसेना व काँग्रेस पक्ष एकत्र येत नगरपंचायतची सत्ता हस्तगत केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला सत्तेतून पायउतार होत विरोधी बाकावर बसावे लागले आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी गटातील शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येच कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. या कुरघोडीच्या राजकारणाला विरोधक हवा देत आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप करीत अनेकबाबतीत पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन सत्ताधाऱ्यांचे राजकीय वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे.

परंतु सतत आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांना पाण्यात पाहाणारे सत्ताधारी व विरोधक मात्र आजच्या नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान एकत्र आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बंडखोर शिवसेना यांनी एकत्र येत प्रत्येकी सभापतीपद पदरात पाडून घेतले आहे. नगरपंचायतची सार्वत्रिक निडणूक अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशातच लाभाचे पद मिळविण्याठी सत्ताधारी व विरोकांचे मनोमिलन झाल्यामुळे शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.

यावेळी सर्वच विषय समितीच्या सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध झाल्या. अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी राष्ट्रवादीचे गगन माळवदकर तर सदस्य म्हणून अबूलवफा कादरी, श्याम नारायणकर, बाळू कोरे, सीमा लोखंडे आरोग्य व दिवाबत्ती सभापतीपदी काँग्रेसचे श्रीनिवास फुलसुंदर यांची निवड झाली. सदस्य म्हणून पौर्णिमा लांडगे, आरती गिरी, श्याम नारायणकर, आरीफ खानापुरे

कर संकलन, विकास, नियोजन व शिक्षण समितीच्या सभापतिपदी बंडखोर सेनेचे प्रताप घोडके यांची निवड करण्यात आली सदस्यपदी बाळू कोरे, आयुब शेख, निर्मला स्वामी, आरीफ खानापुरे महिला व बाल कल्याण सभापतिपदी कमल भरारे तर सदस्य म्हणून पौर्णिमा लांडगे, जयश्री कांबळे, नाजमीन शेख पाणीपुरवठा सभापतिपदी शिवसेनेचे गटनेते अभिमान खराडे सदस्य म्हणून श्याम नारायणकर, आरीफ खानापुरे, बाळू कोरे यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी पालिकेच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

(edited by- pramod sarawale)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com