अल्प कापूस उत्पादन अन् बाजारपेठेत मिळेना भाव 

मारोती नाईकवाडे 
Saturday, 5 December 2020

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वरुणराजाने परिसरात सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. असाच फटका कापसाला बसला. एक-दोन वेचणीतच कापूस निकामी होत असल्याने पाहिलेले स्वप्न पुन्हा धुळीस मिळाल्याचे चित्र पालम तालुक्यात दिसून येत आहे. 

पालम ः गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वरुणराजाने परिसरात सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. असाच फटका कापसाला बसला. एक-दोन वेचणीतच कापूस निकामी होत असल्याने पाहिलेले स्वप्न पुन्हा धुळीस मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

तालुक्यातील उमरा, खोरसपेठ, पिंपळगाव, सिरसम, फरकंडा, डिग्रस, जवळा, गुळखंड, फळा, पारवा, पेठशिवनी, रावराजुर, चाटोरी, पारवा आदी गावातील परिसरात मुख्य पीक म्हणून कपाशीची लागवड केली जाते. यंदाही परिसरात कपाशीचे क्षेत्र मोठे आहे. सुरुवातीपासून चांगला पाऊस असल्याने कपाशी चांगली तरारली होती. मात्र, सतत झालेला पाऊस कपाशीच्या मुळावर उठल्याने नुकसान झाले. शेतात पाणी साचल्याने ऐन फुले, पाते लागण्याच्या कालावधीत बसलेल्या फटक्याने कपाशी नंतर तरी सावरेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. त्यासाठी खर्चही केला. मात्र, फायदा झाला नाही. अशात पुन्हा लाल्या रोगासह बोंडअळीने धुमाकूळ घातल्याने उरली-सुरली आशाही मावळली. कपाशीची प्रथम वेचणीची तयारी सुरू असतानाच परतीच्या पावसाने दणका दिला. त्यामुळे कापूस ओला झाल्याने पुन्हा नुकसान झाले. सध्या तर एक व दोन वेचणीतच कपाशीचा सुपडा साफ झाला. सततच्या पावसामुळे कपाशीचे झाड पाहिजे त्या प्रमाणात अन्नद्रव्य बनवू शकले नाही. त्यामुळे पाऊस उघडताच ही झाडे पिवळी व लाल पडली. 

हेही वाचा - ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत वाद, छगन भुजबळांना महत्त्व देत नसल्याने घोषणाबाजी

शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने होतेय लूट 
जवळपास खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी कापूस विक्रीसाठी काढत आहे. परंतू, तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी बाहेरील तालुक्यातील जावे लागत आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्र चालू असल्याचा फायदा व्यापारी मोठ्या प्रमाणात घेत आहेत.

हेही वाचा - गुणकारी शतावरीच्या लागवडीने एक कोटीची गुंतवणुक धोक्यात! उमरगा तालुक्यात चार लाखांची रोपे फेकली -

कपाशीला केलेला खर्चही निघाला नाही
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले. कपाशीला केलेला खर्चही निघाला नाही. जो काही कापूस राहिला त्या कापसाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यंदा दोन वेचणीतच कापूस संपला असून खर्चापेक्षा उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाली. 
- बापुराव दिवटे, शेतकरी. 

 
संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Low cotton production and unmatched prices in the market, Parbhani News