गुणकारी शतावरीच्या लागवडीने एक कोटीची गुंतवणुक धोक्यात! उमरगा तालुक्यात चार लाखांची रोपे फेकली

अविनाश काळे
Saturday, 5 December 2020

कमी पाण्यात आणि खर्चात दीड वर्षात भरघोस उत्पन्न देणाऱ्या शतावरी वनस्पतीची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले. गेल्या अडीच वर्षांत तालुक्यात जवळपास पन्नास एकर क्षेत्रावर शतावरीच्या लागवडीसाठी संबंधित कंपन्यांनी रोप विक्री करून प्रत्यक्ष उत्पन्नानंतर जागेवर खरेदी करुन चांगला भाव देण्याविषयीचा करार केला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) :  कमी पाण्यात आणि खर्चात दीड वर्षात भरघोस उत्पन्न देणाऱ्या शतावरी वनस्पतीची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले. गेल्या अडीच वर्षांत तालुक्यात जवळपास पन्नास एकर क्षेत्रावर शतावरीच्या लागवडीसाठी संबंधित कंपन्यांनी रोप विक्री करून प्रत्यक्ष उत्पन्नानंतर जागेवर खरेदी करुन चांगला भाव देण्याविषयीचा करार केला. पण आता उत्पन्न हाती आल्यानंतर खरेदी करण्यासाठी एक वर्षापासून चालढकल करण्यात येत असल्याने जवळपास एक कोटीची आर्थिक गुंतवणूक अडकल्याने शेतकरी संभ्रमात सापडला आहे.  

 

आधुनिक पद्धतीने शेतीमध्ये उत्पन्न घेण्यासाठी तरूण शेतकऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यात काही शेतकरी यशस्वी होतात तर बऱ्याच शेतकऱ्यांना आर्थिक फटकाही बसतो, तरीही जिद्द कायम ठेवून उत्पन्नाच्या अपेक्षेने प्रयत्न सुरु असतो. आयुर्वेदिक औषधासाठी गुणकारी असलेल्या शतावरीचे उत्पन्न घेण्यासाठी तालुक्यातील जवळपास वीस  शेतकऱ्यांनी निर्णय घेतला. शतावरीचे रोप विक्री करून प्रत्यक्ष उत्पन्नानंतर त्याच्या मूळांची खरेदी करण्यासाठी बऱ्याच कंपन्या बाजारपेठेत उतरल्या. पुण्याची २४- कॅरेट असो की सांगलीची संग्राम कंपनी यांनी शेतकऱ्यांना शतावरीच्या आर्थिक भरभरारीचे महत्त्व पटवून दिले. एका कंपनीने ५०, तर दुसऱ्या कंपनीने प्रत्येकी ३२ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना रोपाची विक्री केली. शेतकऱ्यांनी रोख रक्कम देऊन रोपांची खरेदी केली.

प्रत्यक्ष उत्पन्न मिळण्याचा कालावधी अठरा महिन्याचा असून त्यानंतर संबंधित कंपनीने जागेवर मूळांची खरेदी योग्य दरात करण्याची हमी करारपत्राद्वारे दिली. कुन्हाळीचे तरुण शेतकरी श्रीकृष्ण तांबे यांच्या तालुक्यातील पेठसांगवी, मुरुम, कोराळ, उमरगा, भिकारसांगवी आदी गावातील शेतकऱ्यांनी ग्रुप करून २०१८ मध्ये रोपांची खरेदी केली. श्री.तांबे यांनी एक एकर क्षेत्रासाठी ६७ हजार रुपयांची एक हजार ७५० रोप घेतली. त्याची योग्य पद्धतीने लागवड, मेहनत केल्याने शतावरी बहरली. प्रत्यक्ष उत्पन्न हाती येऊन वर्षाचा कालावधी होत आहे. मध्यंतरी लॉकडाउनचा काळ होता तो आता संपला तरी, संबंधित कंपनीकडुन कराराप्रमाणे खरेदीसाठी चालढकल सुरू असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

चार लाखांची शतावरी उकीरड्यावर !
जकेकूर शिवारात अविनाश थिटे यांनी रोपासाठी साठ हजार, औषध व इतर खर्च असा साठ हजार असे सव्वा लाखातून २०१९ च्या डिसेंबर महिन्यात उत्पन्न हाती आले होते. मजूराने व ट्रॅक्टरने शतावरीची मूळं बाजूला काढण्यासाठी पदरमोड केली. ती सुकवली आता त्याला आता वर्ष होत आले तरीही संबंधित कंपनी माल घेण्यासाठी आली नसल्याने श्री.थिटे यांनी जवळपास चार लाखांची शतावरी उकिरड्यात फेकून दिली. दरम्यान कोराळचे शेतकरी परमेश्वर जाधव शतावरीची लागवड करून अडचणीत आले आहेत. मालाचा उठाव होत नाही शिवाय अडीच वर्ष जमिनीत दुसऱ्या पिकाचा पर्याय निवडता आला नाही.

 

कंपनीकडून रोपं खरेदी केल्याच्या पावत्या, करारपत्र शेतकऱ्यांकडे आहेत. कंपनीने ओली शतावरी ३० रुपये दराप्रमाणे खरेदी करण्याचे सांगितले होते. उत्पन्न हाती येऊन वर्ष होत आहे. मात्र कंपनी खरेदीला प्रतिसाद देत नाही. आता मूळांची साल काढून माल देण्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्याकडे आधुनिक यंत्रसामुग्री नाही. कालावधी संपल्याने जमिनीतच मूळांची नासाडी होत आहे. वाळलेल्या शतावरीचा दर प्रतिकिलो शंभर ते १७० रुपयापर्यंत आहे. मात्र शेतकऱ्यांनी आणखी महिने प्रतीक्षा करायची. संबंधित कंपनीने शेतकऱ्यांची फसगत करण्यापेक्षा ओल्या शतावरीची खरेदी करून दिलासा देणे गरजेचे आहे.
- श्रीकृष्ण तांबे, शेतकरी, कुन्हाळी

शेतकऱ्यांना चार पैसे अधिक मिळावेत म्हणून कंपनीने शतावरीच्या लागवडीला प्रोत्साहन दिले. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा विस्कटल्या. अनेक अडचणीतून मार्ग काढून कराराप्रमाणे शतावरी खरेदी होईल. संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क सुरु आहे.
- बबन पवार, संचालक , २४- कॅरेट प्रा.लि.पुणे

 

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Useful Shatavari Cultivation Of One Crore Investment In Trouble Umarga