मोफत अंत्यसंस्कार उधारीवर!

माधव इतबारे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • स्मशानजोगींचे थकले दोन महिन्यांचे पैसे 
  • अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे, गोवऱ्या उधारीवर 
  • एका अंत्यसंस्कारासाठी मिळतात अडीच हजार रुपये 
  • मोफत उपक्रम बंद करण्याचा स्मशानजोगींचा इशारा 

औरंगाबाद- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यसंस्कार योजनेचे महापालिकेने पुनरुज्जीवन केले आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली; मात्र स्मशानजोगींना गेल्या दोन महिन्यांपासून छदामही मिळालेला नाही. त्यामुळे अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे, गोवऱ्या व इतर साहित्य उधारीवर आणून मोफत अंत्यसंस्कार योजनेचा लाभ सध्या दिला जात आहे. थकीत पैसे मिळावेत, यासाठी स्मशानजोगींनी सोमवारी (ता. 25) महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना 2014 मध्ये तत्कालीन महापौर कला ओझा व उपमहापौर संजय जोशी यांनी पुढाकार घेत सुरू केली होती; मात्र त्यानंतर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बंद पडली. तत्कालीन आयुक्तांनी महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत योजना बंद केली. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली; मात्र प्रशासनाचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याने योजना सुरू होण्यास तब्बल दोन-तीन वर्षे लागली. 

हेही वाचा : फडणवीस सरकारविषयी अंतीम निर्णय उद्या, शपथविधी वेळीची पत्रे उघड 

अंत्यसंस्कार झाल्यानंतर स्मशानजोगींच्या खात्यावर आठ दिवसांत पैसे जमा करण्याचा निर्णय झाला होता; मात्र दोन महिने उलटले तरी अद्याप स्मशानजोगींना पैसे देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे सोमवारी महापौरांची भेट घेऊन थकीत पैसे देण्याची मागणी केली. पैसे मिळाले नाहीत तर मोफत अंत्यसंस्कार योजना बंद करण्यात येईल, असा इशारादेखील स्मशानजोगींच्या शिष्टमंडळाने दिला; मात्र तातडीने तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली. 

उधारीवर आणलेली लाकडे संपली 
एका अंत्यसंस्कारासाठी महापालिका अडीच हजार रुपये देते. त्यानुसार आज ना उद्या पैसे मिळतील, या अपेक्षेवर स्मशानजोगींनी उधारीवर साहित्य आणले; मात्र पैसे मिळत नसल्यामुळे आता उधारीवर देखील साहित्य मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आम्ही सोमवारपासून मोफत अंत्यसंस्काराची पावती स्वीकारणार नाही, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 

राज्यात 1.89 लाख पदे रिक्त, मेगाभरतीचा केवळ गवगवा

योजना सुरू राहणे गरजेचे 
अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्याकडे अंत्यसंस्कारासाठीही पैसे नसल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या. गरिबांच्या "घाटी'त तर महिन्यातून अशा दोन-तीन घटना घडतात. त्यामुळे मोफत अंत्यसंस्काराची योजना सुरू राहणे अत्यंत आवश्‍यक असल्याचे मत शहरवासीयांनी व्यक्त केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mahapalikas free funeral scheme on borrowing!