उदगीर तालुक्यातील महाराष्ट्र-कर्नाटकाच्या तिन्ही सीमा बंद, कोरोनामुळे प्रशासनाचा निर्णय

युवराज धोतरे
बुधवार, 25 मार्च 2020

उदगीर तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या तिन्ही सीमा प्रशासनाने मंगळवारी (ता.२४) बंद केल्या आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही कर्नाटकाच्या नागरिकांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येत नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांनी दिली आहे.

उदगीर (जि.लातूर) : उदगीर तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या तिन्ही सीमा प्रशासनाने मंगळवारी (ता.२४) बंद केल्या आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही कर्नाटकाच्या नागरिकांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येत नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांनी दिली आहे.

राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत राज्य शासनाने सोमवारी (ता.२३) संचारबंदीचे आदेश काढून राज्याच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या आदेशाने ग्रामीणचे पोलिस निरीक्षक श्री. शिरसाठ यांनी उदगीर तालुक्यात महाराष्ट्र कर्नाटकाच्या असलेल्या जानापूर, तादळापूर या दोन सीमा, तर देवनी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी उदगीर तालुक्यातील पण देवणी पोलीस ठाणे हद्दीतील तोगरी येथील सीमा मंगळवारपासून (ता.२४) बंद केल्या आहेत. या सीमेवरून कर्नाटकातील नागरिकांना अत्यावश्यक करण्यासाठी जर उदगीरकडे जात असतील तर त्यांना पाठवण्यात येत आहे.अन्यथा इतर कारणासाठी राज्यात प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक सीमेवर दोन पोलिस तैनात करण्यात आले असून लातूरच्या मुख्यालयाचे अजून दोन पोलिस सीमेवर दाखल होणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. शिरसाठ यांनी सांगितले.

वाचा ः खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन, निराधार व्यक्तींना दिले जातेय अन्न

आरोग्य तपासणी अनिवार्य
या सीमा भागातून महाराष्ट्रात अत्यावश्यक कारणासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी बुधवारपासून (ता.२५) करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे पथक पोलिसबरोबर काम करणार आहे. जर संसर्गजन्य पार्श्वभूमी आढळल्यास त्यांना तात्काळ आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे श्री. शिरसाठ यांनी सांगितले.

उजनी येथे लातूर-उस्मानाबाद सीमेवर नाकाबंदी
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (ता.२३) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभर संचारबंदीचे आदेश दिले. तसेच सर्व जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्याचे जाहीर केले. त्या अनुषंगाने सोमवारी रात्री पासूनच येथे उस्मानाबाद लातूर जिल्हा सीमेवर भादा पोलिस ठाण्याच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. या मार्गावरून सर्वाधिक मुंबई, पुणे, सोलापूर येथून प्रवाशी लातूर जिल्ह्यात प्रवेश करतात. लातूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नसल्याने खबरदारी म्हणून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आधिकारी डॉ.देवणीकर हे पोलिसांच्या साह्याने अशा प्रवाशांची आरोग्य तपासणी करून त्यांना घरीच राहण्यासंदर्भात सूचना देत आहेत. अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहने वगळता बाकी खासगी वाहनांची व प्रवाशांची चौकशी करूनच जिल्ह्यात प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी सहपोलीस निरीक्षक संदीप भारती व श्री. वाडकर आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra-Karnataka's Three Borders Closed, Udgir