चाकूर पंचायत समितीत ७२ पैकी केवळ पाच कर्मचारी हजर, मनसेने केले आंदोलन

प्रशांत शेटे
Friday, 21 August 2020

कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी शुक्रवारी (ता.२१) सकाळी चाकूर पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी ७२ पैकी केवळ पाच कर्मचारी वेळेत हजर होते.

चाकुर (जि.लातूर) : कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी शुक्रवारी (ता.२१) सकाळी चाकूर पंचायत समिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी ७२ पैकी केवळ पाच कर्मचारी वेळेत हजर होते. इतर गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी पक्षाच्या वतीने चार तास गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

वाचा : 'मारुतीच्या' रूपाने देशमुखांची औसा मतदारसंघात मजबूत तटबंदी, उटगेंना...

चाकूर तालुक्याच्या विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. इतर शहरातून येणे-जाणे करीत असल्यामुळे त्यांना कार्यालयात येण्यासाठी उशीर होतो. सदरील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांनी तहसीलदारांकडे दिले होते. तरीही कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे शुक्रवारी सकाळी डॉ.भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. कार्यालयात ७२ पैकी फक्त पाच कर्मचारी हजर होते.

हेही वाचा : मांजरा धरणातील मृतसाठा भरला, लातूरचा एक वर्षाचा पाणी प्रश्न मिटला

उशीरा येणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांचे प्रवेशाद्वारावर छायाचित्र घेत त्यांच्या येण्याच्या वेळांची नोंद घेतली. यातून ७२ पैकी ४२ कर्मचारी उशिरा येणे, रजा न देता गैरहजर असल्याचे आढळून आले. या सर्वांवर कारवाई करावी यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावरून गटविकास अधिकाऱ्यांनी ४२ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस काढली. त्यांनतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, सुरेश शेवाळे, अजय धनेश्वर, जनार्दन इरलापल्ले, दत्ता सूर्यवंशी, तुलसीदास माने, मारोती पाटील आदी सहभागी झाले होते.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Navnirman Sena Agitation Chakur News