
नांदेड जिल्ह्यात डॉ. तुषार राठोड यांच्यासह चार माजी आमदारांना पुन्हा गुलाल लागला आहे.
नांदेड - विधानसभा मतदारसंघाचा निकाल सुरू असून, जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पराभव निश्चित झाला आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात डॉ. तुषार राठोड यांच्यासह चार माजी आमदारांना पुन्हा गुलाल लागला आहे. त्यात रावसाहेब अंतापूरकर, माधवराव पाटील जवळगावकर, अशोक चव्हाण, भीमराव केराम यांचा समावेश आहे. भाजपचे मित्रपक्ष म्हणून
राजेश पवार आणि श्यामसुंदर शिंदे यांचा विजय निश्चित झाला आहे. मात्र, अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत यांचा फ्युज मतदारांनी उडविला.
नांदेड जिल्ह्यात भोकर आणि नांदेड दक्षिण मतदारसंघ अत्यंत चुरशीची ठरले होते. भोकर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची शेवटची निवडणूक असल्याचे प्रचारात भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर केले होते. परंतु, त्यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.
जवळपास पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य घेऊन अशोक चव्हाण विजयी झाले. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांच्या पारड्यात कमी मते पडल्याने त्यांचा पराभव अटळ आहे.
जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांना पराभव पत्करावा लागला. त्यात देगलूरचे आमदार सुभाष साबणे, हादगावचे नागेश पाटील आष्टीकर आणि नांदेड उत्तरचे डी. पी. सावंत यांचा समावेश आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुखेडचे डॉक्टर तुषार राठोड यांना दुसऱ्यांदा गुलाल लागला आहे. जिल्ह्यातील माजी आमदार भीमराव केराम, माधवराव पाटील
जवळगावकर, रावसाहेब अंतापूरकर आणि अशोक चव्हाण यांना एकदा गुलाल लागला आहे. जिल्ह्यातील काही अत्यंत अटीतटीच्या झालेल्या होत्या. जवळपास सात उमेदवार विजयी झाल्याचे निश्चित झाले असून फक्त त्यांच्या घोषणेची औपचारिकता बाकी आहे.