esakal | Vidhan Sabha 2019 : लातूर जिल्हा : आघाडी प्रचारात; भाजप संभ्रमात
sakal

बोलून बातमी शोधा

Latur-District

पाणी प्रश्न पेटणार
दुष्काळामुळे लातूरला या वर्षी पुन्हा रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागतोय की काय, अशी परिस्थिती आहे. पाणी प्रश्नावर अमित देशमुख भाजपवर सातत्याने टीका करीत आहेत. मराठवाडा वॉटरग्रीडमध्ये लातूर आणि उस्मानाबादचा समावेश करून तातडीने ३३०० कोटींच्या कामाच्या निविदा काढण्यात संभाजी पाटील निलंगेकरांना यश आलेय. येत्या दोन वर्षांत ‘उजनी’च्या योजनेचे काम सुरू नाही झाले, तर राजीनामा देऊ, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. निवडणुकीत पाणी प्रश्न पेटण्याची शक्‍यता आहे.

Vidhan Sabha 2019 : लातूर जिल्हा : आघाडी प्रचारात; भाजप संभ्रमात

sakal_logo
By
हरी तुगावकर

इच्छुकांच्या भाऊगर्दीने उमेदवारी देताना विलंब, नाराजांची बंडखोरी, यामुळे भारतीय जनता पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे; तर आघाडीचे उमेदवार निश्‍चित झाल्याने त्यांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पाचपैकी तीनच उमेदवार जाहीर केलेत. भाजपकडे इच्छुकांची भाऊगर्दी, अंतर्गत गटबाजीमुळे आमदारदेखील अस्वस्थ आहेत. युतीत संभ्रम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जागावाटप जाहीर झाल्याने त्यांची प्रचारात आघाडी आहे. जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा मतदारसंघ काँग्रेस; तर निलंगा, उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघांवर भाजपचा झेंडा आहे. लातूर काँग्रेसचा बालेकिल्ला आता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपमय झालाय. सहा मतदारसंघांसाठी तब्बल १११ इच्छुक होते. शिवसेनेने दोन जागांवर दावा केला. मंगळवारपर्यंत (ता. १) युतीचे जागावाटप झाले. यात भाजपला पाच, तर शिवसेनेला एक जागा मिळाली. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. त्यांना टक्कर देईल असा उमेदवार भाजपकडे नाही. 

लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ॲड. त्र्यंबक भिसेंऐवजी अमित देशमुखांचे कनिष्ठ बंधू, जिल्हा परिषद सदस्य धीरज देशमुखांना उमेदवारी मिळाली आहे. काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय. भाजपकडून रमेश कराड प्रमुख दावेदार होते. ते प्रचारालाही लागले. पण, युतीत ही जागा शिवसेनेला सुटली. कराड बंडखोरी करण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीचा आग्रह धरलाय.

निलंगा मतदारसंघावर संभाजी पाटील निलंगेकरांचे वर्चस्व आहे. त्यांना लाखावर मताधिक्‍याने विजयी करण्याचा निर्धार समर्थकांनी केलाय. त्यांच्या विरोधात त्यांचेच काका अशोक पाटील निलंगेकर काँग्रेसतर्फे रिंगणात आहेत. त्यांनीही प्रचाराचा जोर लावलाय. काका-पुतण्यातच येथे लढत आहे.

औशात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील हॅट्ट्रिकसाठी उत्सुक आहेत. येथेही भाजपकडून इच्छुकांची भाऊगर्दी होती. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवारांचा येथे दावा होता. अंतर्गत गटबाजी असल्यामुळे भूमिपुत्र की पवार, असा प्रश्न होता. अखेर पवारांना उमेदवारी मिळाली. आता पाटील विरुद्ध पवार सामना रंगेल.

उदगीर या राखीव मतदारसंघात भाजपमध्ये संभ्रम आहे. भाजपचे आमदार सुधाकर भालेराव हॅट्ट्रिकसाठी उत्सुक असले, तरी पक्षांतर्गत विरोधामुळे ते अस्वस्थ आहेत. पहिल्या यादीत त्यांचे नावच नसल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. येथे भाजपतर्फे भालेराव की नवखा उमेदवार, याकडे लक्ष लागलेय.
अहमदपूरमधून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील रिंगणात आहेत. त्यांनी प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. आमदार विनायक पाटील मागील वेळी अपक्ष होते. आता भाजपमध्ये आहेत. त्यांनाच पक्षाने उमेदवारी दिली असली, तरी पक्षांतर्गत विरोध मोठा आहे. पंचायत समितीच्या सभापती अयोध्या केंद्रेंनी पक्षाला रामराम ठोकलाय. त्यांची ‘वंचित’शी बोलणी सुरू आहे. दुसरीकडे, बाजार समितीचे माजी सभापती दिलीपराव देशमुखांनी मेळाव्यांद्वारे शक्तिप्रदर्शन केले. ते अपक्ष रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. लोकसभा तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून जिल्हा भाजपमय झालेला असला, तरी प्रत्येक ठिकाणी गटबाजी आहे. लातूर, उदगीरसारख्या महत्त्वाच्या मतदारसंघांत संभ्रम आहे. बंडखोरीची लागण आहे. आघाडीचे उमेदवार मात्र प्रचाराची राळ उठवत आहेत.

loading image