Vidhan Sabha 2019 : परभणी जिल्हा : दुरंगी, तिरंगी लढतीमुळे चुरस

गणेश पांडे
Friday, 11 October 2019

महत्त्वाचे प्रश्न

  • उंजळबा औद्योगिक परिसराची निर्मिती रखडली
  • जिल्ह्याला शाश्वत पाणीपुरवठ्याची गरज
  • सिंचनासाठी मुबलक पाणी आवश्‍यक
  • जिल्हा रुग्णालयासह सर्व आरोग्य केंद्र असक्षम 
  • ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था

विधानसभा 2019 : आजी-माजी आमदारांसह माजी राज्यमंत्री आणि काही नवखे रिंगणात असल्याने निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. २०१४ मध्ये प्रत्येकी एक शिवसेना आणि अपक्ष, तर दोन जागा राष्ट्रवादीकडे होत्या. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन्हीही जागांवर विजयासाठी कसरत करावी लागणार आहे. पाथरीत अपक्ष आमदार भाजपवासी झाले असले, तरी त्यांच्यासमोर काँग्रेसच्या माजी राज्यमंत्र्यांचे आव्हान आहे. परभणीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढाई रंगणार आहे.

जिल्ह्यात परभणीसह जिंतूर, पाथरी व गंगाखेड हे चार मतदारसंघ आहेत. परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मतदारसंघात जोर मारलाय. त्यांची विकासकामे आणि मतदारांशी थेट संपर्कामुळे त्यांची बाजू भक्कम दिसते. त्यांच्या विरोधात माजी खासदार (कै.) अशोकराव देशमुख यांचे पुत्र रविराज आहेत. माजी आमदार (कै.) कुंडलीकराव नागरे यांचे पुत्र सुरेश हेदेखील अपक्ष रिंगणात उतरलेत. नागरे काँग्रेसकडून इच्छुक होते.

परंतु, त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही. सुरेश नागरेंच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध होता. राष्ट्रवादीनेदेखील त्यांना विरोध केला होता. कदाचित, त्यामुळेच नागरेंना उमेदवारी मिळाली नसावी. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेख मोहम्मद गौस यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसच्याच मतांचे विभाजन होण्याची शक्‍यता आहे.

गंगाखेडमधून राष्ट्रवादीचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांना पक्षाने परत रिंगणात उरवलेय. परंतु, येथूनच संतोष मुरकुटे आणि माजी आमदार सीताराम घनदाट हेदेखील अपक्ष रिंगणात आहेत. शिवसेनेने जिल्हाप्रमुख विशाल कदमांसारखा उमदा तरुण रिंगणात उतरवलाय. वंचित बहुजन आघाडीने करुणा कुंडगिर यांना रिंगणात उतरविले आहे. करुणा कुंडगिर ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजाचे मतदान येथे निर्णायक आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढतीची शक्‍यता असून, या ठिकाणचा विजय हा धक्कादायक असू शकतो.

पाथरीमधून अपक्ष आमदार मोहन फड यांना भाजपने मित्रपक्ष रिपाइंच्या तिकिटावर रिंगणात उतरवलेय. फड यांचे मतदारसंघात चांगले काम असल्याने त्यांची बाजू भक्कम आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसने माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांना रिंगणात उतरवलेय. पूर्वीचा सिंगणापूर मतदारसंघ हा वरपुडकरांचा गड मानला जात होता. त्याच मतदारसंघातील बहुतांश गावे पाथरीत गेल्याने ती वरपुडकरांसाठी जमेची बाजू मानली जाते. वंचित बहुजन आघाडीने या मतदारसंघात विलास बाबर यांना उमेदवारी दिली आहे. 

जिंतूरमधून राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांना टक्कर देण्यासाठी भाजपने रासपच्या तिकिटावर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांच्या कन्या मेघना साकोरे-बोर्डीकर यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळात मेघना यांनी मतदारसंघ पिंजून काढलाय. या मतदारसंघात जिंतूर आणि सेलूसारखे दोन मोठी शहरे येतात. आमदार विजय भांबळे यांच्या पाच वर्षांतील कामगिरीवर मतदार समाधानी आहेत. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने मनोहर वाकळेंना उमेदवारी दिली. या मतदारसंघातून सरळ दुरंगी लढत होण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 parbhani district politics