जिंतूर समितीच्या प्रशासकपद निवडीवरून महाविकास आघाडीत कुरघोड्या

file photo
file photo

परभणी ः मागील अनेक वर्षांचे राजकीय वैर बाजूला सारून शिवसेना, कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस हे तीन भिन्न विचारांचे पक्ष राज्यात सत्तेत बसले. बलाढ्य भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी या महाविकास आघाडीचा जन्म झाला खरा. ज्या पध्दतीने राज्यस्तरावर या तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांच्या सुरात सुर मिसळला असला तरी स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या मात्र एकमेंकावर कुरघोड्या सुरुच असल्याचे समोर येत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्ह्यातील जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकपदाच्या निवडीवरून पेटलेले जिल्ह्यातील राजकारण म्हणावे लागेल.

परभणी जिल्हा तसा पाहिला तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असे म्हटले जाते. कारण या जिल्ह्यातून वारंवार शिवसेनेच्या उमेदवारांचे विजयी होण्याचे प्रमाण अधिक आहे. असे असले तरी जिल्ह्यातील बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता आहे. एकीकडे शिवसेनेच्या विचारांचा वारसा जपणारे परभणी जिल्ह्यातील नागरिक स्थानिक राजकारणात मात्र राष्ट्रवादी कॉँग्रेसला साथ देतांना दिसतात. याचे कारण स्थानिक पातळीवरील सग्या सोयऱ्यांचे राजकारण हे देखील एक कारण असू शकते. स्थानिक पातळीवर राजकारण करताना शिवसेना सुध्दा महाविकास आघाडी नसतांनाही अनेकवेळा जिल्हा परिषद, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयीचे राजकारण करत सत्तेत वाटा मागते. कदाचित स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना राजकीय लाभाची पदे मिळावी यासाठी असे केले जात असावे.

राजीनामा देण्यापर्यंत हिंमत केली

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. राष्ट्रवादीच्या मते कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी जिंतूर राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे तर बोरी (ता.जिंतूर) या ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांना अशासकीय प्रशासक म्हणून संधी देण्याचा अलिखित करार झाला आहे. परंतू, दुसरीकडे शिवसेनेच्यावतीने असा
कुठलाच करार झाला नसल्याचे सांगत जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकपदाच्या निवडीला स्थगिती देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्याचे दालन गाठण्यात आले. शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी या निवडीला विरोध करत या ठिकाणी शिवसेनेचा कार्यकर्ता प्रशासक म्हणून गेला पाहिजे, असे सांगत थेट स्वतः राजीनामा देण्यापर्यंत हिंमत एकत्र केली.

हेही वाचाहिंगोली : रिकाम्या हाताने परत येऊ नका, एसटी महामंडळाचा मालवाहतूक करणाऱ्या चालकांना दम 

राजकीय वाद आगामी काळात निश्चितच वाढेल

खासदार संजय जाधव यांचा पवित्रा पाहून व प्रकरणातील सत्यता पडताळून नगरविकास तथा बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी जिंतूर व मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासकीय मंडळास स्थगिती द्यावी अशी शिफारसच पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी देखील याची चौकशी होईपर्यंत प्रशासकीय मंडळास स्थगिती देण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे आता परत एकदा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. खासदार संजय जाधव यांनी या निवडीवर अक्षेप घेवून स्वताचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्याच्या बातम्या जश्या धडकल्या त्याच वेगाने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. तेव्हाच हे प्रकरण राजकीय वाद पेटविणार असल्याचे दिसत होते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के यांनी खासदारांची मागणी चुकीची असल्याचे सांगत प्रसिध्दी माध्यमाकडे प्रतिक्रिया दिल्या. परंतू दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आदेश आल्यानंतरही राष्ट्रवादीकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यावरूनच जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील राजकीय वाद आगामी काळात निश्चितच वाढेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.

येथे क्लिक करा -- खासदार संजय जाधव यांचे राजीनामा अस्त्र आले कामी, मागणीला मिळाला न्याय

यामागे भाजपच्या स्थानिक नेत्याचे षढयंत्र

जेव्हा जिंतूर बाजार समितीवर भाजपची सत्ता होती तेव्हा खासदार संजय जाधव यांनी आम्हाला सभापतीपद द्या असा आग्रह का धरला नव्हता. आताच कसे त्यांना शिवसैनिकाची काळजी वाटली. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही त्यांनी आम्हाला मदत करण्याऐवजी भाजपला मदत करण्याची भूमिका दिसत आहे. यामागे भाजपच्या स्थानिक नेत्याचे षढयंत्र आहे. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या सहकार्यांची परत फेड करण्यासाठीच हा प्रकार झाला असावा.
- बाबाजानी दुर्राणी, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस

भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळे खेळी

परभणी जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये मिळून शिवसेनेचे फक्त सहा संचालक निवडून आलेले आहेत. मग सहा संचालक असलेल्या शिवसेनेने तीन कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापतीपद मागणे कितपत योग्य आहे ? जिंतूर बाजार समितीतील भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच स्थानिक नेत्यांनी शिवसेनेच्या खासदारांना पुढे करून ही खेळी केली आहे.
- विजय भांबळे, माजी आमदार, जिंतूर

संपादन-  राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com