महाविकास आघाडीची चाल आमदार राणा पाटलांवर 'भारी'; नगरपालिका निवडणुकीत धक्का

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 28 January 2021

आमदार पाटील समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभापतीपदाची संधी मिळाली नाही

उस्मानाबाद: पालिकेच्या सभापती निवडीमध्ये महाविकास आघाडीने मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली आहे. नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांमध्ये दोन गट पडल्याने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाला वगळल्याचे दिसले. यामुळे गुरुवारी झालेल्या नगराध्यक्षांच्या दालनात सभापती पदांच्या निवडीत शिवसेनेला तीन तर राष्ट्रवादीला दोन सभापतीपद मिळाले आहेत.

उस्मानाबाद नगर पालिकेत एकूण ३९ नगरसेवक आहेत. यामध्ये राष्ट्रवादीकडे  १७,  शिवसेना ११, भाजप ८ तर  काँग्रेस दोन व एका अपक्षाचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या एका सदस्याचे निधन झाले आहे. त्यामुळे सभागृहात ३८ सदस्य आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा एक गट समर्थक म्हणून कार्यरत आहे. मागील वर्षी सभापतीपदावर त्या गटाचे वर्चस्व होते. यावेळी मात्र महाविकास आघाडीने त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिल्याचे दिसून आले.

औरंगाबादकर तरुणाने आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, खडतर वातावरणातही...

दरम्यान सभापतीपदावर वर्णी लावताना गटनेत्याच्या पत्राद्वारे अर्ज केले जातात. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन गटापैकी खरा गट कोणता आणि खोटा कोणता याची चर्चा चांगलीच रंगली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर गणेश खोचरे यांची गटनेतेपदी निवड झाली. मात्र त्यास पूर्वीचे गटनेते युवराज नळे यांनी न्यायालयात आव्हान देत दाद मागितली आहे.

सभापती निवडीच्यावेळी पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांनी काम पाहिले. नळे यांनी पीठासीन अधिकाऱ्यांकडे न्यायालयाचा निकाल सादर करत गणेश खोचरे यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. मीच गटनेता असल्याचे सांगत सर्व कागदपत्र त्यांच्याकडे सादर केली. मात्र पीठासीन अधिकारी खरमाटे यांनी नळे याचे सर्व आक्षेप फेटाळून लावत गणेश खोचरेच राष्ट्रवादीचे गटनेते असल्याचे सांगत प्रक्रीया पूर्ण केली.

विषय समितीच्या सभापती निवडीदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकत्र

आमदार पाटील समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभापतीपदाची संधी मिळाली नाही. सहाजिकच पालिकेच्या सभापतीपदावर महाआघाडीचे वर्चस्व पाहायला मिळाले. आज झालेल्या निवडीमध्ये बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदिप घोणे, पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचेच बाबा मुजावर तर शिवसेनेकडून स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी राणा बनसोडे, सोनाली वाघमारे यांची महिला बालकल्याण सभापती तर सिद्धेश्वर कोळी यांची शिक्षण सभापतीपदावर बिनविरोध निवड झाली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahavikas Aghadi took usmanabad nagarpalika MLA Rana Patil