गाजलेल्या ‘या’ घोटाळ्यातील मुख्य आरोपीला जामीन 

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

०- चार कोटी भरा, तरच कारागृहाबाहेर पडा- हायकोर्ट 
०- आरडीसी संतोष वेणीकर व कपील गुप्ता रडारवर 
०- आठ महिण्यापासून शासकिय पाहूणचार
०- अजूनही काही बडे मासे अडकण्याची शक्यता

नांदेड : राज्यभर गाजलेल्या येथील धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा कंपनी मालक अजय बाहेती यांना तब्बल आठ महिण्यानंतर औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती श्री अवचट यांनी चार कोटी रुपयांच्या जातमुचलक्यावर मंगळवारी (ता. तीन) नोव्हेंबर रोजी जामीनावर सुनावनी घेऊन जामीन दिला. परंतु यापैकी एक कोटी रुपये भरण्याची तयारी श्री. बाहेती यांच्या वकिलांनी दाखविली. मात्र पूर्ण चार कोटी रुपये एकदाच भरा त्यानंतरच ‘हर्सुल’ कारागृहातून सुटका होईल असे न्यायालयाने आदेश दिल्याने तुर्त तरी श्री. बाहेती यांचा मुक्काम पुन्हा वाढल्याचे सीआयडीने सांगितले.  

 
कृष्णूर (ता. नायगाव) येथील एमआयडीसीमध्ये अजय बाहेती यांची मेगा फुड नावाची कंपनी आहे. या कंपनीत शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करून त्यावर आधारीत अन्न पदार्थ तयार करण्याची कंपनी आहे. परंतु या कंपनीत जिल्हा पुरवठा विभाग व धान्य वितरण करणारी यंत्रणा हाताशी धरुन शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ चोरीच्या मार्गे ते थेट आपल्या कंपनीत उतरवून घेत. सर्व सामान्याच्या व गरींबाच्या तोंडचा घास हिरावत असल्याची गुप्त माहिती तत्कालीन पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांना मिळाली. त्यांनी अत्यंत गोपनियता बाळगत त्यांनी आपल्या विशेष पथकांमार्फत मेगा फुड या कंपनीत ता. १८ जूलै २०१८ रोजी छापा टाकला. यावेळी कंपनीतून दहा ट्रक शासकिय वितरणाचा गहू व तांदूळ भरलेले जप्त करुन गोदामातील सर्व माल जप्त केला. या कारवाईमुळे धान्याचा गोरखधंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. या प्रकरणी कुंटूर पोलिस ठाण्यात ११ ट्रक चालकासह मुख्य आरोपी अजय बाहेती, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडीया, राजू पारसेवार आणि ललित खूराणा यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल केला. जामीनावर ट्रक चालाकांची सुटका झाली. मात्र अन्य आरोपी फरार झाले होते. 

आठ महिन्यांपासून कारागृहात पाहुणचार

सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या तपासानंतर पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) आला. सीआयडीच्या पोलिस अधीक्षक लता फड, डीवायएसपी श्री. पठाण आणि आर. एम. स्वामी यांनी ता. १० मे २०१९ रोजी मुख्य आरोपी अजय बाहेती, ललित खूराणा, राजू पारसेवार आणि ओमप्रकाश तापडीया यांना अटक कली. तेंव्हापासून ते हर्सुल कारागृहात शासकिय पाहूणचार घेत आहेत. त्यानंतर याच प्रकरणात एक जून २०१९ रोजी पुरवठा विभागाचे रमेश भोसले, रत्नाकर ठाकूर, गोडाऊनकिपर श्री. विप्तल आणि श्री. शिंदे यांना अटक केली. ता. सहा जून २०१९ रोजी या गुह्याचे पहिले दोषारोपपत्र (१४५० पान) नायगाव न्यायालयात दाखल केले. अनेकवेळा आरोपीनी नायगाव व बिलोली व उच्चन्यायालयात जामीन मिळावा म्हणून प्रयत्न केला. मात्र जामीन मिळाला नाही. 

चार कोटी रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन

शेवटी अजय बाहेती यानी जामीन मिळावा म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयात अर्ज केला. त्यांच्या अर्जावर मंगळवारी (ता. तीन) न्यायमुर्ती श्री अवचट यांनी सुनावणी घेतली. यावेळी त्यांना चार कोटी रुपयाच्या जातमुचलक्यावर जामीन दिला. व ही रक्कम एकदाच भरा असा आदेश दिला. टप्प्या-टप्प्याने भरण्याची विनंती फेटाळून लावली. आठ महिण्यानंतर जामीन अजय बाहेती यांना मिळाला तरीसुध्दा पैसे न भरल्यामुळे त्यांचा मुक्काम हर्सुलमध्ये कायम आहे. 

सीआयडीचा ‘से’ महत्वाचा ठरला

सीआयडीने आपल्या ‘से’ (अहवाल) मध्ये शासकिय गोदामातून कंपनीत गेलेला माल हा अंदाजे चार कोटीहून अधिकचा असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यांच्या आहवालावरून जामीनासाठी चर कोटी रुपये भरावे असे न्यायालयाने आपल्या निकालात सांगितल्याचे सीआयडीने सांगितले. सध्या हा तपास पोलिस उपाधिक्षक व्ही. एस. साळुंखे करीत आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The main accused in 'this' scam