esakal | माजलगावकरांच्या प्रयत्नांना यश; २४ तासांत एकही रुग्ण नाही
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

माजलगावकरांच्या प्रयत्नांना यश; २४ तासांत एकही रुग्ण नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माजलगाव (बीड): जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी सोमवारी (ता. ५) माजलगावचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. कोरोना बाधितांचा आकडा शून्यावर आला असून त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सोमवारी जिल्ह्यात २१६६ जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये १०४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर २०६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात रोज सुरू असलेल्या तपासण्यांत मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात ३ ते ४ बाधित रूग्ण सापडत होते परंतु सोमवारी माजलगावकरांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारच्या अहवालात एकही रूग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वच त्रस्त झाले आहेत. दरम्यान नागरिकांनी प्रशासकीय सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच माजलगाव तालुक्याचा पॉझिटिव्ह आकडा शून्यावर आला आहे.

हेही वाचा: Corona Updates: मराठवाड्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

सर्वसामान्यांना या कोरोनातून दिलासा मिळावा याकरिता आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालयांमध्ये सुरू केलेल्या कोविड सेंटरमुळे मोठा लाभ झाला आहे. नागरिकांनी लस उपलब्ध होताच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

शहरासह तालुका परिसरात संसर्ग आटोक्यात आला आहे. असे असले तरी लक्षणे असल्यास अॅंटिजेन, आरटीपीसीर तपासण्या करून घ्याव्यात. तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहावे. लहान बाळांची, घरातील आजारी रुग्णांची काळजी घ्यावी. सोमवारच्या अहवालात दिलासा असला तरी देखिल काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी

loading image