महिलेचा हात धरून मागितला मोबाईल नंबर, मिळाली चार महिने सक्तमजुरी

सुषेन जाधव
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

विवाहितेला जाता-येता अश्‍लील शेरेबाजी करणारा, पीडितेला लज्जास्पद वाटेल असा स्पर्श करणारा आणि चक्क हात पकडून मोबाईल क्रमांक मागणाऱ्यास चार महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी शुक्रवारी (ता. 28) ठोठावली. 

औरंगाबाद - शहरातील विवाहितेला जाता-येता अश्‍लील शेरेबाजी करणारा, पीडितेला लज्जास्पद वाटेल असा स्पर्श करणारा आणि चक्क हात पकडून मोबाईल क्रमांक मागणाऱ्यास चार महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी शुक्रवारी (ता. 28) ठोठावली. 

प्रकरणात 35 वर्षीय विवाहितेने तक्रार दिली होती. त्यानुसार विलास भिकाजी साळवे हा तिच्यावर जाता-येता शेरेबाजी करायचा. ती घरात एकटी असताना तिच्या घरासमोर येऊन अश्‍लील शेरेबाजी करायचा. 13 डिसेंबर 2016 ला सकाळी दहाच्या सुमारास तक्रारदार बचतगटाचे काम करून घरी येत असताना विलास अचानक तिच्या पाठीमागून आला व त्याने वाईट हेतूने तिला स्पर्श केला. त्याच दिवशी दुपारी दीड वाजता तक्रारदार ही तिच्या मुलीला शाळेतून घरी घेऊन येत असताना विलास तिच्या पाठीमागून आला आणि त्याने तिचा हात पकडून मोबाईल क्रमांक मागितला. घडल्या प्रकाराची माहिती तिने तिच्या पतीला दिली. महिलेने दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 डिसेंबरला तक्रार दिल्यावरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहाय्यक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने
विलासला चार महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम फिर्यादीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Gets Four Months' Jail