गावरान आंबा बाजारातून गायब, किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

नेकनूर आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या काला पहाड, साखर गोटी, शेंद्रे, परी, खोबऱ्या, तेल्या, नांगऱ्या, गोटी, शेप्या यासारख्या गावरान आंब्याच्या जाती प्रसिद्ध होत्या. या ठिकाणाहून हैदराबादच्या निजामाला आंबे भेट पाठवले जात असत.

नेकनूर (जि. बीड) - प्राचीन काळापासून आंब्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नेकनूरमध्ये दशकभरापूर्वी शेतातून आलेले आंबे  मनमोकळेपणाने सर्वांना वाटले जायचे. सर्वांना शेतात आंब्याखाली आंबे खाण्यासाठी बोलावले जायचे. त्याच गावात आज आंब्याचे दर हे सर्वसामान्यांना परवडण्यापलीकडे गेल्याने आंब्याची गोडी काहीशी कडवट झाली आहे. त्यातच यावर्षी बाहेरून येणाऱ्या आंब्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वधारले आहेत.

 नेकनूर आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणच्या काला पहाड, साखर गोटी, शेंद्रे, परी, खोबऱ्या, तेल्या, नांगऱ्या, गोटी, शेप्या यासारख्या गावरान आंब्याच्या जाती प्रसिद्ध होत्या. या ठिकाणाहून हैदराबादच्या निजामाला आंबे भेट पाठवले जात असत. आंबे उतरायचे त्या वेळी अगदी बैलगाडी भरून आंबे घरी येत. आंबे घरी आल्यानंतर शेजारी, मित्रकंपनी, पाहुणेरावळ्यांना मोकळ्या हाताने आंब्याचे वाटप होत असे. घरात कोणी मित्र, पाहुणे आल्यानंतर त्यांच्यापुढे पाटी भरून आंबे खाण्यासाठी ठेवले जात; मात्र हवामानातील बदलामुळे कमी होत गेलेला पाऊस या भागातील गावरान आंब्याला मारक ठरला.

हेही वाचा - कृषी सेवा केंद्रचालकासह कंपनीवरही गुन्हा

आताही काही बागांमध्ये अनेक जुनी झाडे दिसून येतात. पण यावर्षी गावरान आंब्याला आंबे न आल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोणत्‍याही आंब्याला आंबे न येणे हे प्रथमच घडत असल्याचे वृद्ध शेतकरी सांगतात. सध्या बाजारात हूर, केशर, लालबाग, बादाम, नीलम यासारख्या जातीचे आंबे उपलब्ध असून लालबाग व नीलमचे दर हे शंभर रुपये किलोच्या आत आहेत. बाकीचे सर्व आंबे दीडशे ते दोनशे रुपये किलोप्रमाणे विकले जात आहेत. एका किलोमध्ये चार ते पाच आंबे येतात. त्यामुळे जवळपास एक आंबा 20 ते 40 रुपयांदरम्यान पडतो. ज्यांची कमाई तीनशे ते चारशे रुपयांदरम्यान आहे त्यांना आंब्याची गोडी चाखता येत नाही. दहा-पंधरा वर्षांपूर्वी या भागात शंभर ते दोनशे रुपये शेकडा या दराने आंबे विकले जायचे. पुढे बदलत्या काळाबरोबर शेकड्याचे डझन व नंतर डझनाने विकले जाणारे आंबे किलोवर विकले जाऊ लागले. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आंब्याची गोडी गेली, असेच म्हणावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangoes disappear from the market, prices beyond the reach of the common man