कृषी सेवा केंद्रचालकासह कंपनीवरही बीडमध्ये गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

  • सील करूनही अप्रमाणित खत विकले 
  • नवगण राजुरीत घडला प्रकार 
  • कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई 

बीड - भरारी पथकाने संशय आल्याने खताचे नमुने तपासणीसाठी पाठवून उर्वरित साठा सील केला. तपासणीत खत अप्रमाणित आढळले. तत्पूर्वीच संबंधित कृषी दुकानदाराने हे खतही विकल्याचा प्रकार तालुक्यातील नवगण राजुरी येथे घडला. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दुकानदार सखाराम ज्ञानोबा जानवळे व ‘भारत अ‍ॅग्रो फर्ट अँड रियालिटी लिमिटेड या कंपनीविरुद्ध मंगळवारी (ता. १६) गुन्हा नोंद करण्यात आला. सदर कारवाई कृषी विभागाच्या भरारी पथकाने केली. 

१७ मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, जिल्हा कृषी विकास अधिकारी सुभाष साळवे, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, बी. एम. खेडकर, रामप्रसाद जोगदंड, मनोहर सिरसाट यांच्या पथकाने तालुक्यातील नवगण राजुरी येथील शिवकृपा अ‍ॅग्रो एजन्सी या कृषी दुकानाची तपासणी केली. यावेळी खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते; तसेच तपासावेळी नोंदणी प्रमाणपत्र मुदतीमध्ये नूतनीकरण केलेले नव्हते, भावफलक लावलेला नव्हता, खरेदी केलेल्या खताचे बिलदेखील नव्हते. यासंदर्भात मागविलेला खुलासाही सखाराम जानवळे यांनी कृषी विभागाला दिला नाही.

मॉन्सून येतो कसा, महाराष्ट्रातील कोणत्या भागात कधी येणार? जाणून घ्या प्रवास

दरम्यान, खताचे नमुने प्रयोगशाळेतून तपासून त्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये ‘भारत अ‍ॅग्रो फर्ट अँड रियालिटी लिमिटेड’ या कंपनीचे खत अप्रमाणित आढळून आले आहे. त्यामुळे याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी भुंजग खेडकर यांनी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून कृषी केंद्रचालक सखाराम ज्ञानोबा जानवळे व ‘भारत अ‍ॅग्रो फर्ट अँड रियालिटी लिमिटेड’ चिखली (ता. वाडा, जि. पालघर) यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेशाचा भंग, अत्यावश्यक वस्तू अधिनियम व फसवणुकीचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार पवन राजपूत करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A case has also been registered against the company including the director of the agricultural service center in Beed