
मागच्या आठ-दहा दिवसांपासून प्रदीर्घ विश्रांतीतर पावसाने सुरवात केली आहे
मराठवाड्यात पावसाचा कहर! मांजरा नदीला पूर, पाण्याची आवकही वाढली
कळंब (उस्मानाबाद): तालुक्यात सलग दोन दिवस सर्वदूर पाऊस झाला. रविवारी (ता.५) मांजरा प्रकल्प क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भूम, जामखेड, खर्डा परिसरातून उगमस्थान असलेली मांजर नदी सोमवार (ता.६) दुथडी भरून वाहत असलेली दिसून आली. कळंब तालुक्यात केवळ १७ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून तालुक्यातील नद्या, ओढे, कोल्हापुरी बंधाऱ्याना अजून म्हणावे तसे पाणी आले नाही. मात्र सर्वदूर झालेल्या मुरपावसामुळे विंधनविहिरी, कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
मागच्या आठ-दहा दिवसांपासून प्रदीर्घ विश्रांतीतर पावसाने सुरवात केली आहे. कळंब तालुक्यात पावसाने अद्यापही सरासरी ओलांढलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश नद्या, नाले, ओढे, कोल्हापुरी बंधारे, छोट्या नद्यांना म्हणावे तसे पाणी आले नाही. बहुतांश भागात रविवारी मुर पाऊस झाला. त्यामुळे विहिरी, कुनलिकेच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उडीद, मुगाची काढणी झाली असून सोयाबीन अजून शेतात हिरवेगार दिसत आहे. काढणी झालेल्या पिकाच्या जागेवर शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेण्याची तयारी करीत असतात. मात्र पावसामुळे शेतीची मशागतीची कामे थांबली आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेतकरी रब्बी हंगामातील पिके घेण्याच्या तयारीला लागतात. ऐन फुलवऱ्यात सोयाबीन पीक असताना पावसाने दडी मारली त्यामुळे शेंगा परिपक्व बनल्या नाहीत. त्यामुळे उत्पन्न घटण्याची शक्यता असून शेतकऱ्याना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
मांजरा नदीला पूर-
रविवारी कळंब तालुक्यात पावसाने हलक्या स्वरूपात हजेरी लावली.मुर पाऊस झाल्याने पाणीपातळीत वाढ होण्यास मदत मिळाल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.तालुक्यात ऐकून १७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.लातूर,अंबाजोगाई,कळंब,केज,धारूर आदी गावासाठी पाणी पुरवठा करणारे मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो ती कळंब तालुक्यातील बहुला,खोंदला, आथर्डी,भाटसांगवी कळंब शहराला खेटून गेलेली मांजरा नदी होय.या नदीचे उगमस्थान भूम,जामखेड,खर्डा परिसरातून झाल्याचे सांगण्यात येते.सोमवारी मांजरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचे दिसून आले.त्यामुळे मांजरा प्रकल्प लवकरच शंभर टक्के भरण्याचे संकेत मिळत असून मांजरा धरणात पाण्याची आवक वाढली अहे.