esakal | Heavy Rain: भूम तालुक्यात पीक, रस्त्यांचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain

ऐन काढणीस आलेली पिके पाण्यात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

Heavy Rain: भूम तालुक्यात पीक, रस्त्यांचे नुकसान!

sakal_logo
By
अब्बास सय्यद

भूम (उस्मानाबाद): तालुक्यात शनिवारी (ता. चार) रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी, ओढ्यांना पूर आला. दरम्यान, यामुळे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले. तित्रंज येथे एका घराची भिंत पडून सात शेळ्या दगावल्या. वंजारवाडी येथेही घरांची भिंत पडून घरातील संसार उपयोगी साहित्य भिजले. दरम्यान, भांडगाव-जवळा रस्ता वाहून गेला. यावर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वांत मोठा पाऊस होता. पावसाने भूम ते कुंथलगिरी, भूम ते आरसोली, भूम ते सावरगाव भूम ते भांडगाव, जवळा मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत पोल पडले. यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

ऐन काढणीस आलेली पिके पाण्यात जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात सध्या कांदा लागवड करण्यासाठी टाकलेले बियाण्यांच्या रोपांचे व कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत या पावसामुळे भर पाडली. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी, नाल्या व ओढ्यांना पूर आला. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध डेअरीवर पोचविण्यासाठी खूप हाल झाले. सर्वत्र पूर येऊन उरले सुरले तलावाच्या पाणी साठ्यात वाढ झाली. काही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले. तालुक्यातील पाच मंडळांपैकी माणकेश्वर, आंबी, भूम, ईट या चार मंडळात अतिवृष्टी झाली.

हेही वाचा: Karuna Sharma: करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी

शनिवारी दिवसा माझ्या शेतातील उडीद पीक काढले होते. रात्रीच जोरदार पाऊस झाल्याने दीड एकरातील काढून टाकलेली उडदाची पसर भिजली. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
- सूरज सुरवसे, शेतकरी चिंचपूर ढगे

तालुक्यात खरीप पिकांचे मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी आणि महसूल विभागाने पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- सूरज गाढवे, शेतकरी भूम.

सध्या तालुक्यातील नुकसानीची आकडेवारी घेणे चालू आहे. पंचनामा केल्यानंतर किती नुकसान झाले ते कळेल.
- एन. एस. पाटील, नायब तहसीदार भूम.

loading image
go to top