esakal | सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन पेरणीचे अनेक फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

सरी वरंबा पद्धतीने पेरणी करा

सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन पेरणीचे अनेक फायदे

sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर.

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : बीबीएफ यंत्राद्वारे सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी केल्यास एकरी आठ किलो बियाण्याची व खताची बचत होऊन खर्चातही बचत होते. असा सल्ला तालुका कृषी अधिकारी एस. पी. काळे यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला.

बुधवारी (ता. २६) तालुका कृषी अधिकारी कार्यालयातर्फे तालुक्यातील वस्सा येथे कोरोना नियमांचे पालन करत मोजक्या शेतकऱ्यांच्या सहभागाने खरीप हंगामपुर्व प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी श्री. काळे यांनी बीबीएफ यंत्राद्वारे सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी केल्यास होणारे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सरीवरंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्यास एकरी आठ किलो बियाण्याची व खताची बचत होऊन खर्चातही बचत होते.

मूलस्थळी जलसंधारण होत असल्याने कमी पाऊस झाल्यास सरीमुळे जास्त काळ ओलावा टिकून राहतो तसेच जास्त पाऊस झाल्यास अतिरिक्त पाणी शेताच्या बाहेर निघून जाते.

हेही वाचा - देशभरात सरासरी ६.३ टक्के लसींचे नुकसान होत असल्याची बाबही समोर आली आहे.

सरीमुळे हवा खेळती राहते व पिकास भरपूर सूर्यप्रकाश मिळतो त्यामुळे शेंगा चांगल्या भरतात परिणामी पीक उत्पादन वाढीस मदत होते. शिवाय सरीमुळे फवारणीची कामे सुलभतेने करता येतात व सरीमध्ये तूषारचे पाईप टाकून पाणी देणे सोईचे होते. सरीवरंबा पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात हमखास २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी या पद्धतीने पेरणी केलेली आहे त्यांना हमखास फायदा झालेला असल्याचे सांगितले.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत सामाविष्ट गावातील शेतकऱ्यांनी सरीवरंबा पद्धतीने पेरणी केल्यास हेक्टरी एक हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेण्याचे तालुका कृषी अधिकारी श्री. काळे यांनी याप्रसंगी आवाहन केले. प्रशिक्षणास सरपंच राम राऊत, बाळासाहेब देशमुख, शेख ईलीयास, बाबू मिया, अरविंद साळवे, मंडळ कृषि अधिकारी कृष्णदेव थिटे, कृषि सहाय्यक एस. एस. वाघमारे, समूह संघटक संतोष कदम व गावातील शेतकरी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे