अद्रकावर अनेक रोगांचा प्रादुर्भाव

प्रवीण अकोलकर
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

हतनूर, टापरगावसह (ता. कन्नड) परिसरात यंदा अद्रकाची चांगली लागवड करण्यात आली आहे. या पिकावर सध्या कंदसड आणि करपा रोगांनी आक्रमण केले आहे. यामुळे अद्रकची लागवड केलेले परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा हतनूर, टापरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अद्रकाची जवळपास 120 हेक्‍टरवर परिसरात लागवड केली आहे.

हतनूर  (जि.औरंगाबाद) : हतनूर, टापरगावसह (ता. कन्नड) परिसरात यंदा अद्रकाची चांगली लागवड करण्यात आली आहे. या पिकावर सध्या कंदसड आणि करपा रोगांनी आक्रमण केले आहे. यामुळे अद्रकची लागवड केलेले परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. यंदा हतनूर, टापरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी अद्रकाची जवळपास 120 हेक्‍टरवर परिसरात लागवड केली आहे.

यावर्षी पावसाळ्याच्या सुरवातीपासून पावसाने रिमझिम ते दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खरिपातील पिकासह अद्रकचे पिके चांगल्या प्रमाणात बहरले; परंतु सध्या परिसरातील अद्रकावर करपा आणि कंदसड रोगांनी मोठे आक्रमण केले आहे. यामुळे अद्रक लागवड केलेल्या शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत परिसरात सुमारे वीस हेक्‍टरवर अद्रकाची वाढ जास्त झाली आहे. गेल्यावर्षी अद्रक पिकाला पाण्याची भीषण टंचाई जाणवली या परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे विकतचे पाणी देऊन अद्रकची पिके जोपासली होती.

यावेळी अद्रकला भावही आठ ते दहा हजारांचा मिळाला; परंतु यंदाही या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. परिसराला अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून परतीच्या पावसाने तरी दमदार हजेरी लावावी. जेणेकरून परिसराला मुख्य बागायती पट्टा बनवणाऱ्या शिवना-टाकळी प्रकल्पाची पाणीपातळी वाढेल. सद्यःस्थितीत शिवना-टाकळी प्रकल्पात जवळपास दहा ते अकरा टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. परिसराला परतीच्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भविष्यात पिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावणार, असे मत आप्पासाहेब जाधव, एकनाथ डोळस, धरमू लोखंडे, भास्कर जाधव, आत्माराम परांडे, संतोष करवंदे, गोकुळ चव्हाण, दिलीप केवट, संजय घुगे, बाळू अकोलकर या शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many Diseases On Ginger Crop