
लातूर : निलंगा येथे अकरा दिवसांपूर्वी उस्मानाबादमार्गे गुपचूप आलेल्या परप्रांतीयांनंतर जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद असताना जिल्ह्यात येत असलेल्या पुणे व मुंबईकरांनी चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. मुंबईहून आल्यानंतर कोणालाही खबर न लागू देता आलेल्या दोन मुंबईकरांचे नमुने मंगळवारी (ता.१४) आरोग्य विभागाने घेतले. आठ परप्रांतीयांचा अपवाद सोडला तर जिल्हा प्रशासनाने कोरोनाला वेशीबाहेरच रोखण्यात यश मिळवले होते. आता सीमोल्लंघन करून येणाऱ्या या पुणे व मुंबईकरांची धास्ती लातूरकरांना आहे.
जिल्ह्यात परप्रांतीयांनंतर पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालाच तर या गुपचूप येऊन या कानाची त्या कानाला खबर लागू न देणाऱ्या पुणे व मुंबईकरांमुळेच होईल, अशी भावनाही लातूरकर व्यक्त करीत आहेत. यामुळेच कोरोनाला नकळत सोबत घेऊन येणाऱ्या पुणे व मुंबईसह अन्य ठिकाणच्या नागरिकांबाबत जिल्हावासीयांना डोळ्यांत तेल घालून सतर्क राहावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसांची नजर चुकवून छुप्या मार्गाने जिल्ह्यात गुपचूप दाखल झालेल्या नागरिकांसह त्यांना आणून सोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिला.
चार एप्रिल रोजी आठ परप्रांतीयांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करत कोरोनाला सीमेबाहेरच रोखले होते. मात्र, छुप्या व पर्यायी मार्गाने जिल्ह्यात येणाऱ्यांवर पोलिसांचा कसलाच अंकुश नसल्याने परप्रांतीय जिल्ह्यात दाखल झाले. या घटनेनंतर जिल्हा सीमेवर कडक तपासणी सुरू झाली तरी वाहनांची वर्दळ कायम आहे. जीवनावश्यक मालाची वाहतूक तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने मोठ्या संख्येने धावत आहेत. ही वाहने पुणे व मुंबईवरून येत असल्यानेही डोकेदुखी वाढली आहे. मालासोबत ही वाहने कोरोनालाही सोबत घेऊन येतात की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दररोज हजारहून अधिक वाहने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करत आहेत. या वाहनांसोबत छुप्या मार्गाने जिल्ह्यात दाखल होणाऱ्यावर प्रशासनासह नागरिकांवरही नजर ठेवण्याची गरज पुढे येत आहे.
हेही वाचा ः पुढील तीन महिने सतर्क राहा, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचना
दोघांच्या अहवालाची प्रतीक्षा
यादरम्यान जिल्ह्यात मंगळवारी दोन मुंबईकरांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली. यातील एकजण उदगीर, तर दुसरा किल्लारी येथील आहे. हे दोघेही चार दिवसांपूर्वी मुंबईहून छुप्या मार्गाने गुपचूप येऊन घरी थांबले होते. कोरोनाची लक्षणे जाणवताच त्यांनी तपासणी करण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर आरोग्य विभागाने दोघांच्या स्वॅबची नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली. दोघांसह चौदा व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल रात्री उशिरापर्यंत येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.