सरपंच आरक्षण सोडत लांबणीवर ;गावपुढाऱ्यांचा हिरमोड

दिलीप गंभीरे
Tuesday, 15 December 2020

तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीकरीता 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

कळंब (उस्मानाबाद) : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम २३ डिसेंबर पासून होणार आहे. त्यापूर्वी १८ डिसेंबरला सरपंचपदाच्या आरक्षण कार्यक्रम नियोजित होता. या आरक्षण सोडत कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सोमवारी स्थगिती दिली असून ग्रामपंचायतच्या निवडणूका झाल्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होईल असे म्हटले आहे. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडत लांबणीवर पडल्याने अनेक गावपुढाऱ्यांचा  हिरमोड झाला आहे.

हे ही वाचा : नुकसान एकाचे मावेजा दुसऱ्यालाच, पूरग्रस्त शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या कळंब तालुक्यातील 91 ग्रामपंचायतीपैकी 59 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 15 जानेवारीला होत आहेत. तत्पूर्वी 18 डिसेंबर रोजी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार होता. मात्र आता आरक्षण सोडतीचा मुहूर्त टळला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे याचा धसका अनेकांनी घेतला आहे. याचा जबरदस्त फटका सरपंच पदावर डोळा ठेवून निवडणूक लढविणाऱ्याना बसणार आहे. 

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात तीस हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतिक्षेत 

तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीकरीता 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी होऊन 31 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल. अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 4 जानेवारी 2021 राहील. 4 जानेवारी दुपारी तीन नंतर अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध होईल. 15 जानेवारीला मतदान होऊन 18 जानेवारीला मतमोजणी होईल. सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार असल्याने निवडणूक कशी लढवावी, असा प्रश्न अनेकासमोर उभा ठाकला आहे. 

निवडून आल्यानंतर कोणत्या प्रवर्गातील आरक्षण हे आता सांगता येत नाही. त्यामुळे उमेदवार कोण कसा द्यावेत ही मोठी समस्या गाव पुढाऱ्यासमोर निर्माण झाले आहे. आता निवडणुकीसाठी खर्च करावा की नाही, निवडणूक लढवली तर घरातील कोणी लढवावी, घरातील महिलेने की पुरुषाने असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबल्यामुळे मात्र अनेकांचा हिरमोड झाला आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Many village leaders have become frustrated as the sarpanch has postponed the reservation