esakal | नुकसान एकाचे मावेजा दुसऱ्यालाच, पूरग्रस्त शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damaged corn

निलंगा तालुक्यातील गेल्या दोन महिन्याखाली मदनसुरी, सरवडी, चांदोरी सोनखेड या तेरणा नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे.

नुकसान एकाचे मावेजा दुसऱ्यालाच, पूरग्रस्त शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (जि.लातूर) : तालुक्यातील गेल्या दोन महिन्याखाली मदनसुरी, सरवडी, चांदोरी सोनखेड या तेरणा नदीकाठच्या गावांतील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेले शेतकरी वंचित असून, नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांना मावेजा दिला असल्याचा आरोप करीत मदनसुरी (ता. निलंगा) येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. शिवाय अनुदान नाही मिळाल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मागील दोन महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शिवाय तेरणा नदीला आलेला महापूर त्यामध्येच माकणी धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. त्यामुळे तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पिके वाहून गेली, काढलेले सोयाबीन वाहून गेले, जमिनी खरडून गेल्या अशा परिस्थितीमध्ये शासनाने प्रशासनास आदेश देऊन शेतकऱ्यांचे झालेले नुकसानभरपाई पोटी नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली.

प्रशासनाला झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ अहवाल प्रशासनास सादर करावा. यामध्ये एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले असतानाही तालुक्यातील कोकळगाव, रामतीर्थ, कांबळेवाडी, जेवरी, पिंपळवाडी, मदनसुरी, बामणी, धानोरा, सोनखेड, चांदोरी, येळनूर, औरादशहाजानी, मानेजवळगा अशा गावांतील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी खरडून गेलेल्या आहेत. मात्र, शासनाच्या आदेशाचे पालन न करता कुठेतरी एखाद्या ठिकाणी बसून ठरावीक लोकांना हाताशी धरून चुकीचे पंचनामे करून संबंधित गावातील बऱ्याचशा शेतकऱ्यांवर अन्याय झालेला आहे.

अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. नदीकाठचे पूरग्रस्त शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले शेतकरी वंचित राहिले असून, ज्या शेतकऱ्यांचे फारसे नुकसान झाले नाही. अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. सरसकट शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे अशी मागणी तेरणा नदीकाठच्या जवळपास १२५ शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्वरित पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई नाही मिळाल्यास आंदोलन करू असा इशारा निवेदनात दिला आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image