मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव, आंदोलकांनी दिल्या घोषणा

आनंद इंदानी
Thursday, 24 September 2020

बदनापूर येथे तहसील कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले.

बदनापूर (जि.जालना) : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता.२४) बदनापूर तहसिल कार्यालयाला घेराव घालण्यात आला. यावेळी आंदोलकांनी 'आरक्षण आमच्या हक्काचे' व 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. मराठा समाजाला लढा दिल्यानंतर आरक्षण मिळाले. मात्र सर्वोच्च न्यायालयात शासनाच्या उदासीन धोरणामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली.

मराठा आरक्षणाच्या स्थगितीला शासनाची अनास्था कारणीभूत असल्याचा आरोप करीत बदनापूर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी दुपारी बदनापूर तहसिल कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. पांढऱ्या गांधी टोप्या व तोंडाला मास्क बांधून आंदोलकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भौतिक अंतर प्रणालीचेही काटेकोर पालन केले. यावेळी अवघ्या प्रशासकीय इमारतीला आंदोलकांनी वेढा मारत घेराव घातला.

आता 'मुक' नाही 'ठोक मोर्चा' ; ९ ऑक्टोबरपासून तुळजापुरातून...

तसेच 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणा देत अवघा परिसर दणाणून सोडला. यावेळी मराठा आरक्षण पूर्ववत लागू करण्यासह मराठा आरक्षणाची स्थगिती उठेपर्यंत सर्व नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्याची आग्रही मागणीही करण्यात आली. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेश जऱ्हाड, देवकर्ण वाघ, पंकज जऱ्हाड, नंदकिशोर दाभाडे, नंदकिशोर शेळके, परमेश्वर गोते, पद्माकर जऱ्हाड, रविकुमार बोचरे, राम सिरसाठ, राधाकिसन शिंदे, विष्णू शिंदे, गजानन काटकर, विष्णू कोल्हे, बळीराम मोरे, किरण चौधरी यांच्यासह मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marath Kranti Morcha Gheraved Tahsil Office Jalna News