esakal | लातुरात आमदारांच्या घरासमोर हालगी वाजवून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Maratha Morha Andolan Latur

लातूर येथे आमदार विक्रम काळे यांच्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

लातुरात आमदारांच्या घरासमोर हालगी वाजवून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी. तसेच आरक्षण टिकवण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी आदी मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता.२७) येथील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या घरासमोर हालगी वाजवून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर श्री. काळे यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

दोन हजार मेंढ्या बचावल्या, तरुणांनी दिला मेंढपाळाला मदतीचा हात
 

आंदोलकांनी निवेदनात म्हटले, मराठा समाज गेली अनेक वर्षे आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी समाजाने ५८ मूकमोर्चे काढले. अनेक रास्ता रोको आंदोलन केले. या मागणीसाठी ४२ मराठाबांधव हुतात्मा झाले. यातून शासनाने गायकवाड आयोग नेमला. २०१८ मध्ये समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळाले. पण, काही जण याच्या विरोधात गेले. यात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे समाजात असंतोष आहे.

त्यामुळे शासनाने आता मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढावा, अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी फेरविचार याचिका दाखल करावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना शिक्षा करून न्याय द्यावा, स्थगितीच्या आदेशापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेश मिळाले आहेत, त्यांना संरक्षण द्यावे, आदेशापू्र्वपर्यंत प्रकाशित झालेल्या जाहिरातींचा आधार घेऊन प्रवेश व भरती करावी, स्थगिती आदेश उठेपर्यंत पोलिस तसे कोणतीही मेगा भरती करू नये, एमपीएससीच्या होऊ घातलेल्या परीक्षांसंदर्भात मराठा मुलांनी एसईबीसीच्या कोट्यातून अर्ज भरले आहेत, त्याचे काय होणार याचा खुलासा सरकारने करावा, सारथी संस्थेसाठी दोन हजार कोटींची तरतूद करावी, सारथी संस्थेचे जिल्हानिहाय नियंत्रण व माहिती कक्ष निर्माण करावेत, सारथी संस्थेच्या अंतर्गत देण्यात येणारी शिष्यवृत्ती तसेच विविध मानधन त्वरित वितरित करावे, राज्यातील मराठा तरुणांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत रोजगार उपलब्ध होतील, अशा योजना तयार करून प्रशिक्षण द्यावे, सारथी संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मोफत कोचिंग, सीईटी एनईटी परीक्षा तयारी, आर्मी प्रशिक्षण, अशा अभ्यासक्रमाच्या योजना तयार करून प्रशिक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला एक हजार कोटींची तरतूद करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

पंकजा मुंडें संधीच सोनं करणार का ?

या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे भगवान माकणे, आदित्यराणा चव्हाण, प्रवीण खाडप, बालाजी जाधव, अनिल जाधव, विशाल हल्लाळे, किसन कदम, सचिन साळुंके, निखिल मोरे, संजय क्षीरसागर, विजयकुमार महाजन, चंद्रकांत शिंदे, गोविंद सूर्यवंशी, जीवन तुपे, चंद्रकांत शिंदे, आकाश येवते आदी सहभागी झाले होते.

संपादन - गणेश पिटेकर