सर्वसामान्यांचा आवाज होणार बुलंद

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 January 2018

औरंगाबाद - ‘सकाळ सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज आता बुलंद होत आहे. औरंगाबादकरांसाठी हे व्यासपीठ आहे. यातून सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’चे हे पाऊल सामाजिक बदलाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात हे आहेत ‘सकाळ’च्या ‘सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’चे सदस्य.

औरंगाबाद - ‘सकाळ सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’च्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज आता बुलंद होत आहे. औरंगाबादकरांसाठी हे व्यासपीठ आहे. यातून सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. ‘सकाळ’चे हे पाऊल सामाजिक बदलाच्या दिशेने महत्त्वपूर्ण आहे. या उपक्रमात हे आहेत ‘सकाळ’च्या ‘सिटीझन्स जर्नालिस्ट फोरम’चे सदस्य.

ज्ञानेश्‍वर जाधव - वॉर्ड क्रमांक ३
पाच महिन्यांनंतरही पाण्यासाठी भटकंती 

औरंगाबाद - राधास्वामी कॉलनी, गायकवाड हौसिंग सोसायटी, हितोपदेश सोसायटी, चेतनानगर, छत्रपती शिवाजीनगर हा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. रस्ते, ड्रेनेजलाइन, पाणी अशा समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे सप्टेंबर २०१७ मध्ये  परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. त्या वेळी आयुक्तांनी दोन महिन्यांत पाणी देतो, असे आश्‍वासन दिले होते; परंतु पाच महिने उलटले असले तरी अद्याप पाण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या नाहीत. नागरिकांना ऐन हिवाळ्यातच पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

धरण उशाला...
एकतानगर भागातील या वसाहतींच्या जवळच हर्सूल येथील तलाव आहे; मात्र पाण्याचा प्रश्‍न सुटत नसल्याने नागरिकांची अवस्था ‘धरण उशाला अन्‌ कोरड घशाला’ अशी अवस्था झाली आहे.

सोमीनाथ शिराणी - वॉर्ड क्रमांक ११४
महिनाभरापासून साताऱ्याचा पाणीपुरवठा खंडित

औरंगाबाद - जलवाहिनी फुटल्यामुळे मागील एक महिन्यापासून सातारा गावातील पाणीपुरवठा खंडित आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नवीन सिमेंटच्या रस्त्याचे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी जलवाहिनी कुजल्याचे निदर्शनास आणून दिले होते. शिवाय अगोदर जलवाहिनीचे काम करावे, नंतर रस्त्याचे अशी सूचनाही केली होती; मात्र संबंधितांनी याकडे दुर्लक्ष करीत सिमेंटचा रस्ता बनविला. आता जलवाहिनी फुटल्यामुळे सर्वत्र पाणी वाया जात आहे; तसेच नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईची झळही सहन करावी लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

गणेश वाघ - वॉर्ड ५१
रस्त्याची दुरवस्था; नागरिकांची गैरसोय 

औरंगाबाद - नागेश्‍वरवाडीच्या गणपती मंदिरासमोर ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले. त्यासाठी रस्ता मधोमध खोदण्यात आला. ड्रेनेजचे काम गरजेचे होते ते नगरसेवकाच्या पुढाकाराने झाल्याने नागरिकांची सोय झाली; मात्र आधीच रस्त्याची चाळणी झालेली असताना खोदकाम केल्यावर त्याला व्यवस्थित न बुजल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचा परिसरातील नागरिकांना धूळ सहन करवी लागत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

पूनमसिंग गोमलाडू - वॉर्ड क्रमांक ५२ 
रस्त्यावर कचराकुंड्यांची गरज 

औरंगाबाद - शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना मुख्य रस्त्यावर उघडा पसरलेला कचरा पादचाऱ्यांना नाकाला रुमाल लावायला भाग पाडत आहे. खडकेश्‍वर विभागीय पशुवैद्यकीय कार्यालयासमोर कचराकुंड्या नाहीत. परिणामी, काही नागरिक कचरा उघड्यावर टाकत आहेत. दरम्यान, मोकाट जनावरे या कचऱ्याला रस्त्यावर पसरवतात. हे चित्र बदलण्यासाठी किमान मुख्य रस्त्यावर तरी महापालिकेने कचराकुंड्या ठेवाव्यात, अशी मागणी होत आहे.

बद्रिनाथ थोरात - वॉर्ड क्रमांक ११५ 
रेल्वे गेटजवळ जीवघेणे खड्डे

औरंगाबाद - शिवाजीनगर-बीड बायपासला जोडणाऱ्या रेल्वे गेटजवळ जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी महापालिकेकडे वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे; पण त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रास्तवरील खड्डे बुजवून रस्ता रुंद करावा; तसेच वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

रोशन मिश्रा - वॉर्ड क्रमांक ३९ 
बालकलावंतांचे स्नेहमिलन उत्साहात

औरंगाबाद - संदीप भगाडे लिखित ‘छोट्यांचे मोठे बोल’ या बालनाट्यातील कलावंतांचा नुकताच स्नेहमिलन मेळावा घेण्यात आला. यात बालकलावंतांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. १८ जानेवारीला तापडिया नाट्यमंदिरात या बालनाट्याचा प्रयोग झाला. नाटकातील वैशिष्ट्य आणि उणिवा यांच्यावर या मेळाव्यात चर्चा झाली. या वेळी प्रतीक्षा डांगे, श्रुती घोडके, रिया काळे, दिनेश चव्हाण, अनुष्का हिवाळे, पूनम हांगे, अंश हिवाळ, धीरज गोराडे, आरोही कोलते, रोहिणी राजपूत, प्रतीक चव्हाण उपस्थित होते. मेळाव्यासाठी मेघा भगाडे यांनी पुढाकार घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news aurangabad marathwada news Sakal citizens Journalist Forum