डॉक्‍टर दांपत्याची प्यारवाली लव्ह स्टोरी 

भाऊसाहेब चोपडे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

सात वर्षे थांबून मी डॉ. कल्याणीसोबत विवाहबंधनात अडकलो. घरच्यांनीसुद्धा मोठ्या मनाने आमचा स्वीकार केला आहे. दोघांनीही मेहनत घेऊन आळंद येथे स्वतःच्या इमारतीमध्ये सर्वसुविधांनीयुक्त रुग्णालय उभारले आहे. 
- डॉ. राजीव श्रीखंडे 

आळंद - आधी ओळख, मग प्रेम; पण आंतरजातीय विवाहाला दोघांच्याही घरच्यांचा विरोध. समाज काय म्हणेल याची भीती. त्यातच ग्रामीण भागात असल्याने आंतरजातीय विवाहाची कल्पना दोघांकडील घरच्यांच्या गळी उतरविणे तसे अवघडच. "व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशीच सुरू झालेली ही प्रेमकथा विविध वळणे घेत सात वर्षे चालली व घरच्यांचा विरोध झुगारून अखेर लग्नामध्ये रूपांतरित झाली. आळंद (ता. फुलंब्री) येथील डॉ. राजीव श्रीखंडे व डॉ. कल्याणी श्रीखंडे यांची ही प्रेमकथा आहे. मराठा समाजाचे डॉ. राजीव श्रीखंडे (मूळ रा. कायगाव, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) व जैन समाजाची डॉ. कल्याणी श्रीखंडे यांची प्रेमकथा 14 फेब्रुवारी 2012 रोजी "व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशीच सुरू झाली. 

राजीव हे फोस्टर डेव्हलपमेंट होमिओपॅथी महाविद्यालयात, तर कल्याणी या भगवानबाबा होमिओपॅथी महाविद्यालयामध्ये शिकत असताना त्यांची योगायोगाने ओळख झाली. राजीव यांचा मित्र सात वर्षांपूर्वी औरंगाबाद येथील एका कॉफी शॉपमध्ये आपल्या प्रेयसीसोबत कॉफी घेण्यासाठी गेले तेव्हा त्या मित्रासोबत राजीव, तर मित्राच्या प्रेयसीसोबत कल्याणी आल्या होत्या. तेथे त्यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तेव्हा राजीव हे "बीएचएमएस'च्या शेवटच्या वर्षात, तर कल्याणी या "बीएचएमएस'च्या प्रथम वर्षात शिकत होत्या. दोघांचेही वैद्यकीय क्षेत्र असल्याने त्यांना अडचणी येतील असे वाटलेच नाही. 
डॉ. राजीव हे शिक्षण पूर्ण करून औरंगाबादमधील एका खासगी रुग्णालयात प्रॅक्‍टिस करू लागले. कल्याणी या शिकत होत्या. या काळात दोघेही एकमेकांपासून दुरावले; मात्र दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनीही आपापल्या घरच्यांसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला; मात्र दोघांचेही आई-वडील ग्रामीण भागातील असल्याने हा आंतरजातीय विवाह त्यांना मान्य नव्हता.

सुरवातीला असलेला त्यांचा हा विरोध दोघांचे प्रेम पाहून हळूहळू मावळला व त्यांनी लग्नास होकार दिला. ता. 7 मे 2016 ला आर्य समाजपद्धतीने त्यांनी विवाह केला. त्यांच्या सुखी संसाराला दोन वर्षे झाली आहेत. त्यांनी आळंद येथे स्वतःच्या मालकीचे हॉस्पिटल उभारले. डॉ. कल्याणी व डॉ. राजीव दोघेही तेथे प्रॅक्‍टिस करतात. 
त्यांना काही महिन्यांपूर्वी म्हणजे 25 ऑक्‍टोबर 2017 रोजी शिवण्या नावाची गोंड्‌स मुलगी झाली. दोघांच्या घरच्यांनी त्यांचा स्वीकार केला आहे. 

सात वर्षे थांबून मी डॉ. कल्याणीसोबत विवाहबंधनात अडकलो. घरच्यांनीसुद्धा मोठ्या मनाने आमचा स्वीकार केला आहे. दोघांनीही मेहनत घेऊन आळंद येथे स्वतःच्या इमारतीमध्ये सर्वसुविधांनीयुक्त रुग्णालय उभारले आहे. 
- डॉ. राजीव श्रीखंडे 

Web Title: marathi news aurangabad news Doctor love valentineday

फोटो गॅलरी