अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

निळकंठ कांबळे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

तालुक्याच्या बहुतांश भागात मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तासभर कमी- अधिक प्रमाणात हा पाऊस पहाटे दोनपर्यंत सुरू होता.

लोहारा : तालुक्यात मंगळवारी (ता. 12) पहाटेच्या सुमारास झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याच्या बहुतांश शिवारातील ज्वारीचे पिक आडवे झाले आहे. 

तालुक्याच्या बहुतांश भागात मंगळवारी पहाटे एकच्या सुमारास विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तासभर कमी- अधिक प्रमाणात हा पाऊस पहाटे दोनपर्यंत सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या ज्वारीचे पीक फडातच आडवे झाले आहे. कणसात पाणी गेल्याने ज्वारी काळी पडण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील लोहारा, जेवळी, माकणी, अचलेर, बेंडकाळ, मार्डी, सास्तूर,धानुरी, आष्टाकासार, कास्ती आदी भागांत हा अवकाळी पाऊस झाला. ज्वारी पिकाबरोबरच हरभरा, गहू, करडई या पिकांनाही या वादळी वारे व अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या भागात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र या पिकाचेच मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील बेलवाडी येथे पहाटे दीडच्या सुमारास सेवालाल मंदिरावर वीज कोसळली. त्यात मंदिराच्या भिंतींना भेगा पडल्या असून, भिंतीही काळ्या झाल्या आहेत. जवळपास एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Marathi news Marathwada rain