मराठी शाळांच्या गुणवत्तेचा टक्का वाढला 

हरी तुगावकर - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

लातूर - राज्य शासनाने सुरू केलेल्या "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमा'चे परिणाम दिसू लागले असून, सरकारी शाळांतील शिक्षकांनी गुणवत्तेची कास धरल्याने या शाळांचा टक्का वाढू लागला आहे. वर्षभरात 19 हजार 794 शाळा प्रगत झाल्या आहेत, तर 14 हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना "जय महाराष्ट्र' करत मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे. 

लातूर - राज्य शासनाने सुरू केलेल्या "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमा'चे परिणाम दिसू लागले असून, सरकारी शाळांतील शिक्षकांनी गुणवत्तेची कास धरल्याने या शाळांचा टक्का वाढू लागला आहे. वर्षभरात 19 हजार 794 शाळा प्रगत झाल्या आहेत, तर 14 हजार विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांना "जय महाराष्ट्र' करत मराठी शाळेत प्रवेश घेतला आहे. 

मागील काही वर्षांत राज्याची शैक्षणिक गुणवत्ता घसरत चालली होती. त्यामुळे शासनाने "प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम' हाती घेतला व राज्याला राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या उपक्रमात राज्यात सुमारे 60 हजार 851 शाळांमधील शिक्षकांनी स्वयंस्फूर्तीने ज्ञानरचनावादी शाळांना भेटी दिल्या. त्या शाळांमध्ये ज्ञानरचनावादी पद्धत कार्यान्वित केली. राज्यात सुमारे 28 हजार 791 शाळा डिजिटल, 13 हजार 923 शाळा कृतियुक्त शिक्षण देणाऱ्या, दोन हजार 279 आयएसओ मानांकित, 44 हजार 416 तंत्रस्नेही शिक्षण शाळा झाल्या आहेत. राज्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेकडून 22 हजार 793 शाळा दत्तक घेण्यात आल्या आहेत. यात आता शासकीय शाळांचा गुणवत्तेचा टक्का वाढत चालला आहे. राज्यातील 19 हजार 794 शाळा प्रगत झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे. राज्यात 14 हजार विद्यार्थी इंग्रजी शाळेला "जय महाराष्ट्र' करत मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल झाले आहेत. इतकेच नव्हे, तर समाजाचा शासकीय शाळांवरील विश्‍वास वाढत असल्याने आतापर्यंत 173 कोटी लोकनिधी शाळांनी प्राप्त केला आहे. 

उपक्रमशील शिक्षकांना परदेशवारी 
राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शंभर दीपस्तंभ शाळा निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठवले आहे. प्रोग्रॅम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट (पीसा) च्या चाचणीत आशिया खंडातील सिंगापूर, तैवान, जपान, चीन, दक्षिण कोरिया, फिनलंड हे अग्रेसर आहेत. या ठिकाणची शिक्षण पद्धती समजून घेऊन आपल्या शाळांमधील मुलांची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जावर नेण्याचा प्रयत्न होणार आहे. या देशांना स्वखर्चाने भेट देण्यासाठी 340 शिक्षकांनी तयारी दर्शविली आहे. अशा शिक्षकांना शासनाने परवानगी दिली आहे. या परदेश दौऱ्यासाठी निधीची व्यवस्था लोकसहभागातून, स्वच्छेने दिली जाणाऱ्या देणगीत करण्याचीही परवानगी शासनाने दिली आहे.

Web Title: Marathi percent increase in the quality of schools