esakal | Marathwada: जातपंचायतीचा जाच; दांपत्याने घेतले विष
sakal

बोलून बातमी शोधा

Caste Panchayat

उस्मानाबाद : जातपंचायतीचा जाच; दांपत्याने घेतले विष

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून पारधी समाजातील एका दांपत्याने विष घेतले. यात पतीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या त्यांच्या नातेवाइकांनी मंगळवारी (ता. पाच) मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून जात पंचायतीच्या म्होरक्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी ठिय्या दिला.उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथील रहिवासी सोमनाथ छगन काळे (ह. मु. काकानगर, उस्मानाबाद) यांचे त्यांच्या नातेवाइक महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पारधी समाजातील म्होरक्यांनी जात पंचायत भरवून सोमनाथला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

त्यापैकी २० हजार रुपये वसूल केले होते. मात्र, उर्वरित १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी जात पंचायतीच्या पुढाऱ्यांनी सोमनाथकडे सतत तगादा लावला. पैसे देण्यास विलंब केल्यास अमानवी जाचक अटी लादण्यात आल्या. त्यामुळे जात पंचायतीच्या त्रासाला कंटाळून सोमनाथ आणि त्यांच्या पत्नीने २२ सप्टेंबरला विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पत्नीच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान सोमनाथ यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथील रुग्णालयात मंगळवारी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला. या प्रकरणातील जात पंचायतीच्या म्होरक्यांवर कारवाई करून त्यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

loading image
go to top