esakal | Marathwada: एकसष्ट हजार हेक्टरला अतिवृष्टीचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका

मराठवाडा : एकसष्ट हजार हेक्टरला अतिवृष्टीचा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर, ता. १४ (बातमीदार) : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिंतूर तालुक्यात ५३ हजार ५०५ शेतकऱ्यांचे ४२ कोटी ३१लाख ९५ हजार ८०० रुपयांचे एकसष्ट हजार सहा हेक्टर वरील पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अजून पंचनामे सुरू असल्याने यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

तालुक्यात ८४२०३ हेक्टर खरिप लागवडीचे क्षेत्र असताना यावर्षी ९६ हजार हेक्टरवर लागवड झाली. परंतु सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाहून गेला, जमिनी खरडून गेल्या, अद्यापही अनेक ठिकाणी पिकांमधील पाण्याचा निचरा झाला नाही, यामध्ये पूर्णा नदीकाठच्या हंडी, वझर,उमरद, बोरकिन्ही, सावंगी-म्हाळसा, येलदरी, मुरुमखेडा, हिवरखेडा, इटोली, निलज, सावळी, खोलगाडगा येलदरी धरणाच्या लाभक्षेत्रात व सिध्देश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गडदगव्हाण, टाकळखोपा, दाभा, डिग्रस तसेच करपरा नदीकाठच्या निवळी, वर्णा, बोरी, नागापूर, आसेगाव गावांसह या मोठ्या नद्यांच्या उपनद्या आणि ग्रामीण भागातील लहान नद्या, ओढे, नाले यांच्या परिसरातील पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

यामध्ये सोयाबीनच्या शेंगाना मोड फुटले, झाडाच्या काड्या झाल्याने सोयाबीन पिकाला ८५ ते ९० टक्के फटका बसला. वळचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या, पिकलेली बोंडे गळून पडली, सडली. तूर, हळद या व इतर पिकांचेही बरेच नुकसान झाले. येलदरी धरणाखालील चार किलोमीटरवर हिवरखेडा येथील माजी पंचायत समिती सदस्य व शेतकरी भगवानराव महाळणर यांनी त्यांच्या तीन एकर क्षेत्रात लागवड केलेले सोयाबीन पुराच्या पाण्यात वाहून गेले.

तर, वेळोवेळी आलेल्या पुरामुळे सावळी-बु.येथील शेतकरी जनार्दन घुगे यांच्या शेतातील सर्वच पिके उध्वस्त झाली. दोन दिवसांपूर्वी कृषी व महसूल कर्मचाऱ्यांच्या पथकाने अंगलगाव तांडा येथे केलेल्या पिक कापणी प्रयोगात एका ठिकाणी १०×५ मीटरच्या क्षेत्रात फक्त ३२५ ग्रॅम सोयाबीनचे उत्पादन आले तर दुसऱ्या ठिकाणी ६३० ग्रॅम उत्पादन आले. यावरून झालेले नुकसान लक्षात येते.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

तालुक्यात झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकाचे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे. सोयाबीनच्या दाण्याची प्रत खराब झाल्याने ते बियाणेसाठी वापरता येणार नाही.

-एस.पी. काळे, तालुका कृषी अधिकारी, जिंतूर.

येलदरी धरणातून सोडण्यात आलेला प्रचंड विसर्ग व अतिवृष्टी यामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे हिवरखेडा येथील माझ्या शेतात पाणी घुसून तीन एकरमधील काढणीला आलेले सोयाबीन पूर्णपणे वाहून गेले. नुकसानीपोटी आर्थिक मदत करावी.

-भगवानराव महाळणर, शेतकरी हिवरखेडा.

loading image
go to top