Rain : मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; पेरण्या सुरू

मराठवाड्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरसह लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली आदी जिल्ह्यांना बुधवारी रात्री व आज पहाटे पावसाने दमदार हजेरी.
Flood
FloodSakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात दीर्घ प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजीनगरसह लातूर, धाराशिव, जालना, हिंगोली आदी जिल्ह्यांना बुधवारी रात्री व आज पहाटे पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे खरिपाच्या पेरणीला सुरवात झाली आहे.

आर्द्रा हे नक्षत्र संपण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. जिल्ह्यात काल व आज सर्वत्र दमदार पाऊस झाला. सर्व साठही महसूल मंडळांत पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरणीला सुरवात केली आहे. आज संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३७.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली शहरातही पावसाच्या सरी कोसळल्या.

धाराशिवमध्ये पेरणीयोग्य पाऊस

महिनाभरापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या जिल्ह्यातही सर्वदूर पेरणीयोग्य पाऊस झाला. तेरखेडा परिसरात चांगला पाऊस झाल्याने तेरणा नदी प्रवाही झाली. परंडा तालुक्यातील निजाम-जवळा महसूल मंडळात सर्वाधिक ७० तर भूम मंडळात ६८ मिलिमीटर पाऊस झाला. उमरगा, लोहारा, कळंब, तुळजापूर तालुक्यातही दमदार पाऊस झाला.

छत्रपती संभाजीनगरात २९ मि.मी. पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरात दुपारी काहीकाळ मुसळधार सरी कोसळल्या. २९.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात जोरदार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले. शिवना-धोत्रा मार्गावरील पुलावर पाणी आल्याने काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला. अजिंठा-बुलडाणा राज्य मार्गावर दीड ते दोन फूट पाणी साचल्याने वाहनांना कसरत करावी लागली. सोयगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहिले.

रावेरमध्ये पुरात बुडून दोघांचा मृत्यू; एक बेपत्ता

रावेर - महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये बुधवारी (ता. ५) सायंकाळी झालेल्या ढगफुटीमुळे तालुक्यातील जवळपास सर्वच नदी-नाल्यांना पूर आला. या पुरात तालुक्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता आहे. या अचानक आलेल्या पुरात २० जनावरे वाहून गेली असून, १४५ घरांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील मोरव्हाल येथील बळिराम रायसिंग बारेला (वय ४५) हा शेतमजूर किराणा घेण्यासाठी गेला असता अभोडा नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. सकाळी त्याचा मृतदेह सापडला तर शहरातील फुकटपुरा भागातील शेख इक्बाल शेख सत्तार (वय ५६) यांचा नागझिरी नाल्याशेजारील आपल्या घरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने घराची भिंत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

येथील माजी उपनगराध्यक्ष आणि रावेर शिक्षण संवर्धक संघाचे संचालक सुधीर गोपाळ पाटील (वय ४८) हे बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या जुन्या घरातून अवघ्या २०० मीटर अंतरावर असलेल्या नवीन घरात येत असता मोटरसायकल घसरल्याने नागझिरी नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळपासून त्यांचे नातेवाईक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधकार्य सुरू केले असून त्यांची मोटारसायकल नाल्यात आढळून आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.