मराठवाडा मुक्तिदिनी उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर पहाटे ध्वजवंदन

युवराज धोतरे
Thursday, 17 September 2020

मराठवाड्यातील सर्वात अगोदर सुर्योदयापूर्वी पहाटे साडेपाच वाजता येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर उदगीरचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिले ध्वजवंदन गुरूवारी (ता.१७) झाले. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उदगीर महसुल विभागातील परंपरेनुसार निजाम काळापासून उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर तहसीलदारांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याची परंपरा उदगीरच्या इतिहासात आहे.

उदगीर(लातुर) : मराठवाड्यातील सर्वात अगोदर सुर्योदयापूर्वी पहाटे साडेपाच वाजता येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर उदगीरचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पहिले ध्वजवंदन गुरूवारी (ता.१७) झाले. मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उदगीर महसुल विभागातील परंपरेनुसार निजाम काळापासून उदगीरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर तहसीलदारांच्या हस्ते ध्वजवंदन करण्याची परंपरा उदगीरच्या इतिहासात आहे.

या परंपरेनुसार महसुल विभागाच्या वतीने तंतोतत पालन होऊन ऊन, वारा व पाऊस असो किवा कितीही प्रतिकुल परिस्थिती असो स्वातंत्र्य दिन, मराठवाडा मुक्तीदिन व प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ऐतिहासिक किल्ल्यात महाराष्ट्रातील सर्वात अगोदर ध्वजवंदन करण्यात येते. गुरूवारी (ता.१७) पहाटे साडेपाच वाजता तहसिलदार श्री.मुंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, मंडळ अधिकारी शंकर जाधव, तलाठी शिवानंद गुंडरे, रमेश रुद्देवाड, शिवकांत थोटे आदी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात धो-धो : मांजरा, तेरणा नदी तुडुंब, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

मराठवाड्याच्या मुक्तिसंग्राम चळवळीमध्ये उदगीरकरांचा सिंहाचा वाटा आहे. तालुक्यातील कौळखेड परिसरातील रामघाट येथे अनेक वेळा लढाया झाल्या आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशच्या सीमाभागात आप्पाराव पाटील कोळकर यांच्या टोळीचा अजूनही इतिहास कायम आहे. या भागातील हत्तीबेट, तोंडचिर परिसर, घोणसी, तिरूका परिसर या भागात अनेक वेळा तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी रझाकारांशी लढाया केल्याचा इतिहास आहे. स्वातंत्र्यसैनिकांची मोठी चळवळ या भागात त्या काळी उभारली गेली होती. त्यामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्यात मदत मिळाली होती.

टाळेबंदीचे नियम पाळून ध्वजवंदन
उदगीर शहर व परिसरामध्ये कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय कार्यालय व शाळा, महाविद्यालयामध्ये टाळेबंदीचे नियम पाळून ध्वजवंदन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. तहसील कार्यालय, शहरातील महाविद्यालय, नगरपालिका, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह विविध शासकीय कार्यालयात त्या-त्या कार्यालयाच्‍या प्रमुखांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजवंदन झाले.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada Independence Day Flag Hoist At Udgir Fort