
Pachod Crime: मोठ्या कष्ट व उमेदीने पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात आणला असता त्याला मातीमोल दर मिळत असल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी फुकट --- फुकट म्हणत आपला भाजीपाला रस्त्यावर फेकून दिल्याने सर्वत्र पालेभाज्याचा रस्त्यावर सडा पडून त्यावरून वाहने गेल्याने फळभाज्याचा अक्षरक्षः चिखल झाल्याचे चित्र रविवारी (ता. २९) पाचोड (ता.पैठण) च्या आठवडे बाजारात पाहवयास मिळाले.
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत रविवारी पाचोड येथे आठवडे बाजार भरतो. या बाजारा ला पैठण तालुक्यासह गेवराई, अंबड, शेवगाव छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणाहून शेतकरी आपला उत्पादीत भाजीपाला व फळभाज्या विक्रीसाठी आणतात, तर हा खरेदीसाठी विविध ठिकाणाहून व्यापारीही मोठ्या प्रमाणात येतात. उन्हाळ्यात पाणी टंचाईमुळे पालेभाज्यांना उच्चांकीचा दर मिळाल्याने प्रत्येक भाजीपाला उत्पादकांचा कल पालेभाज्या उत्पादनाकडे वाढला. त्यातच समाधारककारक पाऊस झाल्याने विहीरी व कुपनलीकांच्या पाणी पातळीत वाढ होऊन आतापर्यंत सर्व जलसाठ्यांनी तग धरला.
त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे आपला मोर्चा वळविला, तुर्तास सर्वत्र शेतात टोमॅटो,कोबी,वांगे, पालेभाज्या , कोथिंबिरीचे भरमसाठ निघू लागल्याने बाजारात भाज्यांची भरमसाठ आवक होऊन दरात कमालीची घसरण झाली. भाजीपाला लागवड करुन त्याच्यावर केलेला खर्चही हाती येत नसल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत सापडलेले आहे.