चापोलीचे शिवार होतेय पाणीदार

प्रा. डॉ. रवींद्र भताने
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

जलयुक्त शिवारअंतर्गत झालेल्या नाला सरळीकरणामध्ये पाणी साचल्याने यावर्षी याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. जलयुक्त शिवार समितीच्या सदस्य व ग्रामस्थांच्या परिश्रमाला यश आले आहे. या कामामुळे पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार योजना चापोलीसाठी वरदानच ठरत आहे.
- नीलेश मद्रेवार,  अध्यक्ष, जलयुक्त शिवार समिती, चापोली

चापोली - जलयुक्त शिवार अभियानात चापोली परिसरात झालेल्या दोन टप्प्यातील साडेसहा किलोमीटर नाला सरळीकरणात सध्या तुडुंब पाणी भरले आहे. यामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढली असून शेजारील शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे. 

शिवारात येथे एप्रिल २०१६ व एप्रिल २०१७ या दोन टप्प्यात जलयुक्त शिवारअंतर्गत नाला सरळीकरणाचे काम झाले आहे. पहिल्या टप्प्यासाठी ग्रामस्थांनी लोकवाटा जमा केला होता. यासाठी पंचायत समिती सदस्य नीलेश माद्रेवार, सरपंच उत्तम सरकाळे, उपसरपंच जिलानी शेख, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रभाकर होनराव, रमेश कुलकर्णी, सुरेश शेवाळे, मल्लिकार्जुन मलिशे, नंदू पाटील, रामराव पाटील, लक्ष्मण पेटकरसह आदींनी परिश्रम घेतले होते. जलयुक्तचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी आर्थिक अडचण येत होती. त्यावेळी टाटा ग्रुपने पुढाकार घेतला व टाटा ग्रुपच्या सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या रॅलीज इंडिया लिमिटेड कंपनीच्या सीनियर मॅनेजर जिज्ञासा कुरलापकर व अभियंता श्रीकांत म्हात्रे व सुचेत माळी यांच्या पुढाकाराने येथील जलयुक्तचा दुसरा टप्पा पूर्ण झाला.

जलयुक्त शिवारअंतर्गत दोन टप्प्यात काम झालेल्या नाला सरळीकरणामुळे शिवारातील पाणीपातळी चांगलीच वाढली आहे. साडेसहा किलोमीटरच्या नाला सरळीकरणावर एक-एक किलोमीटर अंतरावर पाच सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले आहेत. यामुळे पाणी वाहून न जाता जमिनीतच झिरपत आहे. यामुळे शेजारील ३७ विहिरी व जवळपास ८१ विंधन विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. सध्या शेतकरी गहू, हरभरा, ज्वारी व इतर रब्बीची पिके पेरणी करीत आहेत. जलयुक्त शिवारामुळे मुबलक पाणीसाठा झाल्याने रब्बीचे उत्पन्नही वाढेल अशा प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. या साडेसहा किलोमीटर नाला सरळीकरणामुळे जवळपास २५० हेक्‍टरवरील जमिनीला याचा फायदा होणार आहे.

Web Title: marathwada news jalyukt shivar abhiyan