परळी वैजनाथ येथे अतिक्रमणे जमीनदोस्त

परळी वैजनाथ येथे अतिक्रमणे जमीनदोस्त

परळी वैजनाथ - शहरातील नाथचित्र मंदिर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधीनगर या खुल्या जागेवरील तीस वर्षांपासून थाटलेली अतिक्रमणे मंगळवारी (ता. २८) पोलिस बंदोबस्तात बळाचा वापर करून जमीनदोस्त करण्यात आली. घरावर बुलडोझर फिरवल्याने तेथे राहणारे नागरिक संतप्त झाले आहेत. यावेळी दगडफेकीचा प्रकार झाला. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू होती. येथील नाथ चित्रमार्गावरील सर्व्हे नंबर ४९९ मधील बाजार समितीची मार्केट यार्ड ही खुली जागा आहे.

याठिकाणी तीस वर्षांपासून अतिक्रमण करून नागरिक राहतात. हातावर पोट असणारे, सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांची येथे वस्ती आहे. शे-दीडशेवर घरे आहेत. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना लाइट, स्वच्छतागृह, रेशनकार्ड, मतदान कार्ड या सर्व सुविधा देण्यात आलेल्या आहेत. ही अतिक्रमणे काढण्याचा बाजार समितीकडून अनेक वेळा प्रयत्न झाला; परंतु बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना अपयश आले. दीर्घकाळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट राहिले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही जागा आज कोट्यवधी रुपयांची आहे. त्यामुळे बाजार समितीने नियोजन करून ही अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेतला. अखेर मंगळवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्यात आली. 

रहिवाशांना वेळ द्यायला हवा होता - पंकजा मुंडे
परळी वैजनाथ - शहरातील राजीव गांधीनगर भागातील अतिक्रमण काढताना नगरपालिका व बाजार समितीने रहिवाशांचा सहानुभूतीपूर्वक विचार न करता त्यांचे संसार उघड्यावर आणले. अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांना अजून वेळ द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. अनेक वर्षांपासून नागरिकांचे अतिक्रमण असले तरी त्यांना पुरेसा वेळ न देता पालिका व बाजार समितीने त्यांच्या घरावर बुलडोझर फिरविला, यामुळे त्यांचे संसार उघड्यावर आले. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई झाली असली तरी पालिका व बाजार समितीने माणुसकीच्या भावनेतून त्यांचा विचार केला नाही, बळाचा वापर केला गेला. शहरात अन्य ठिकाणी त्यांना स्थलांतरित केले असते, तर त्यांचे संसार वाचले असते. गरिबांचे अतिक्रमण काढणाऱ्यांनी श्रीमंतांच्या अतिक्रमणाला मात्र हात लावला नाही, असे सांगून पालिका व बाजार समितीने त्यांच्यावर हा एक प्रकारे अन्यायच केला असून अन्याय करणारा दोन्ही ठिकाणचा सूत्रधार एकच असल्याचे श्रीमती पालवे-मुंडे यांनी म्हटले आहे.

दगडफेक अन्‌ सौम्य लाठीमार 
नागरिकांना विविध पक्ष, संघटना, नेत्यांनी पाठिंबा दिला होता; परंतु बाजार समितीच्या बळापुढे त्यांचे काही चालले नाही. मंगळवारी सकाळीच या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली. येथे राहणाऱ्या नागरिकांनी विरोध केला. महिलांनी ठिय्या दिला. चार तास तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून विरोध करणाऱ्या नागरिकांना बाजूला केले. या वेळी दगडफेकीचा प्रकार झाला. पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. सौम्य लाठीहल्लाही केला. या प्रकारात काही महिला जखमीही झाल्या. तणावाची परिस्थिती निवाळताच अतिक्रमणावर बुलडोझर फिरवण्यात आला. सायंकाळपर्यंत राजीव गांधीनगर भागातील सर्व अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. यामुळे शेकडो नागरिक बेघर झाले आहेत.

पावणेतीनशे जणांचा फौजफाटा 
सहायक पोलिस अधीक्षक विशाल आनंद, पोलिस निरीक्षक हेमंत मानकर यांच्यासह सात पोलिस अधिकारी व शंभर पोलिस कर्मचारी, बाजार समिती, नगरपरिषद असे मिळून १५० कर्मचारी, महसूलचे अधिकारी असा जवळपास २७५ प्रशासकीय फौजफाटा ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी तैनात होता. नायब तहसीलदार सुरवसे, सदानंद बरदाळे, मंडळ अधिकारी राजुरे, बाजार समितीचे सचिव बी. आर. रामदासी आदी प्रशासकीय अधिकारी मोहिमेत सहभागी झाले. दरम्यान, या भागातील नागरिकांना अतिक्रमणे काढण्याबाबत बाजार समितीने वारंवार सूचना दिल्या; परंतु याची कोणतीच दखल घेतली न गेल्यामुळे बाजार समितीला कडक कारवाई करावी लागली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तेचा गैरवापर - प्रा. मुंडे
परळी वैजनाथ - गेल्या ३५ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या राजीव गांधीनगरातील घरांवर बुलडोझर फिरवून परळीत राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू केला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना गोरगरिबांचे संसार उद्‌ध्वस्त करून त्यांच्या तळतळाटापलीकडे राष्ट्रवादीने काय साधले, असा सवाल नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी केला आहे. प्रा. मुंडे म्हणाले, की हातावर पोट असलेल्या गोरगरीब, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना अतिक्रमणाच्या नावाखाली घरे उद्‌ध्वस्त करून देशोधडीला लावण्याचे काम आज परळीत राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. अंबाजोगाईच्या न्यायालयात सुनावणी होऊन निकाल लागणे बाकी असतानाही केवळ गरिबांना त्या जागेवरून उठविण्याचे कारस्थान करायचे असल्याने अतिक्रमण काढण्याची घाई बाजार समितीकडून केली गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com