Earthquake Marathwada : भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरला

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, जालना हे जिल्हे आणि विदर्भाच्या काही भागांतील नागरिकांना गुरुवारची सकाळ भयभीत करणारी ठरली. सकाळी सहानंतर काही मिनिटांच्या अंतराने भूकंपाचे तीन धक्के बसले. सर्वांत मोठ्या धक्क्याची ४.५ रिश्टर स्केल नोंद झाली.
Earthquake Marathwada
Earthquake Marathwada sakal

हिंगोली, नांदेड : मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, जालना हे जिल्हे आणि विदर्भाच्या काही भागांतील नागरिकांना गुरुवारची सकाळ भयभीत करणारी ठरली. सकाळी सहानंतर काही मिनिटांच्या अंतराने भूकंपाचे तीन धक्के बसले. सर्वांत मोठ्या धक्क्याची ४.५ रिश्टर स्केल नोंद झाली. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात होता. या भूकंपामुळे जीवित वा वित्तहानीचे वृत्त नसले, तरी दांडेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथे काही घरांची पडझड झाली आहे. भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने देण्याच्या सूचना गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना हिंगोली प्रशासनाने दिल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी सकाळी ६.०९ ला जमीन चांगलीच हादरली, मोठा आवाज झाला. जिल्ह्यातील सर्वच सातशेपेक्षा अधिक गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगण्यात आले. औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यातील गावांत त्याची तीव्रता अधिक होती. हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात धक्के जाणवले.

पहिल्या दोन भूकंपावेळी केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब, रामेश्वर तांडा तर तिसऱ्या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र, पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे संकेतस्थळावर देण्यात आली. त्याची खोली दहा किलोमीटरपर्यंत होती, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत चार ते पाचवेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. त्यात कोणतीही हानी झालेली नाही.

गूढ आवाजाची परंपरा

हिंगोली जिल्ह्यात तीन ते चार वर्षांपासून भूगर्भात गूढ आवाज होऊन जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, सिरळी, खांबाळा, राजदरी, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर, हारवाडी या भागांत हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. या धक्क्यांची काहीवेळा अतिसौम्य भूकंप म्हणून नोंद झाली आहे. आजचा भूकंप मात्र तुलनेने मोठा होता.

नांदेड जिल्ह्याला हादरे

नांदेड शहरासह जिल्ह्याच्या अनेक गावांना भूकंपाचे तीन धक्के जाणवले. कुठल्याची प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र, काही मिनिटांच्या अंतराने सलग बसलेल्या तीन धक्क्यांमुळे नागरिक भयभीत झाले होते. घरांवरील पत्रे, तावदाने हादरल्याने अनेक ठिकाणी नागरिक काहीकाळ घराबाहेर पडले होते.

Earthquake Marathwada
Nanded Earthquake : नांदेड व परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

दरम्यान, नांदेड शहरात २००८ आणि २०१०-११ मध्ये सायन्स कॉलेज, श्रीनगर, विवेकनगर, गणेशनगर आदी भागांत जमिनीतून गूढ आवाज येण्याचे प्रकार घडले होते. नांदेड शहरात तीन मार्चला भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. त्याची १.५ रिश्टर स्केल नोंद झाली होती. त्या तुलनेत आजचे तीन धक्के मोठे होते. मराठवाड्यासह विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यालाही आजच्या भूकंपाचे धक्के बसले.

घाबरू नये, सतर्क रहावे

नांदेड जिल्ह्यात बसलेले भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. नागरिकांनी घाबरू नये. सतर्क रहावे. ग्रामीण भागात घरांवरील टीनपत्रांवर दगड ठेवले जातात. ते तत्काळ काढून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले.

परभणी जिल्ह्याला सौम्य धक्का

परभणी शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. घरांचे दरवाजे, खिडक्यांची तावदाने, भांडी, फॅन हादरल्याची माहिती नागरिकांनी दिली. अनेकांनी एकमेकांना सावध केले.

जालना जिल्ह्यातही सौम्य धक्के

जालना जिल्ह्यातील अनेक गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले. त्यात अंबड शहरासह तालुक्यातील गोंदी, भणंग जळगाव, भार्डी, घनसावंगी शहरासह तालुक्यातील तीर्थपुरी, जांबसमर्थ, मच्छिंद्र चिंचोली, सिंदखेड, लिंबोनी, परतूर शहरासह तालुक्यातील वाटूर, मंठा तालुक्यातील हेलस व पाटोदा आदी गावांचा समावेश होता. त्याला निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दुजोरा दिला.

भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. नैसर्गिक आपत्तीसंदर्भात संबंधित यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. भूकंप होण्याआधी, दरम्यान व नंतर नागरिकांनी सतर्क राहत विशेष काळजी घ्यावी

- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, हिंगोली

१९९३ नंतरचा मोठा धक्का

लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ ला झालेल्या भूकंपाची आठवण पुन्हा एकदा ताजी झाली. तीव्रतेचा विचार केल्यास त्या भूकंपानंतरचा मराठवाड्यातील सर्वात मोठा भूकंपाचा धक्का गुरुवारी (ता. २१) जाणवला. हिंगोली जिल्ह्यात केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाचे लातूर जिल्ह्यालाही सौम्य धक्के जाणवले. भूकंपाचे लागोपाठ तीन धक्के बसले. येथील भूकंपमापक केंद्रावर ४.५, ३.६ आणि २.६ रिश्टर स्केल अशी नोंद झाली आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ ला ६.४ िरश्टर स्केलचा प्रलयंकारी भूकंप झाला होता. या भूकंपात लातूर जिल्ह्यातील २७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील २५ अशी एकूण ५२ गावे जमीनदोस्त झाली होती. लातूर जिल्ह्यातील तीन हजार ६६७ जणांचा मृत्यू झाला होता. १२८ मुले अनाथ झाली, तर ४३६ जणांना अपंगत्व आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील चार हजार २५ जणांचा मृत्यू झाला होता.

या जिल्ह्यात ९१ मुले अनाथ झाली होती, तर ४१३ जणांना अपंगत्व आले होते. लातूरमध्ये पाच हजार ९७३ तर उस्मानाबाद जिल्ह्यात १६ हजार जनावरे दगावली होती.

दृष्टिक्षेपात

  • भूकंपाचा केंद्रबिंदू रामेश्वर तांडा (जि. हिंगोली) परिसरात

  • जमीन हादरली, मोठा आवाज

  • घरांवरील पत्रे, खिडक्यांची तावदाने हादरली

  • अनेक ठिकाणी नागरिक काहीकाळ घराबाहेर

  • जीवित वा वित्तहानी नाही

  • दांडेगाव (ता. कळमनुरी) येथे काही घरांची पडझड

  • नुकसान झाले असल्यास माहिती देण्याच्या प्रशासनाच्या सूचना

सकाळी ६.०८ ४.५ रिश्टर स्केल

सकाळी ६.१९ ३.६ रिश्टर स्केल

सकाळी ६.२४ २.६ रिश्टर स्केल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com