esakal | मराठवाडा पुन्हा संकटात; वादळी वाऱ्यासह गारपीट होणार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने वर्तवली

मराठवाडा पुन्हा संकटात; वादळी वाऱ्यासह गारपीट होणार

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : यंदा उन्हाळा सुरु होऊनही अद्याप पावसाळी वातावरणाचा अनुभव येत आहे. १० दिवसापूर्वी मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला. आता पुन्हा पुढील पाच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आता आधीच कोरोनामुळे काढणी राहिलेल्या रब्बी हंगामातील पिकांची नासाडी होणार आहे.


हेही वाचा - केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे :  आमदार राहुल पाटील
मागील काही दिवसापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने मुक्काम ठोकला आहे. काही भागात गारपीटदेखील झाली आहे. गत वर्षातील पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिण्यात सलग २२ दिवस अतिवृष्टी झाली. त्यानंतर जानेवारी महिण्यातदेखील ढगाळ वातावरण राहुन पावसाने हजेरी लावली. अख्खा हिवाळा ढगाळ वातावरणात संपला. आता मागील महिनाभरापासून उन्हाळ्यास सुरुवात झाली आहे. मात्र, सातत्याने ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. तसेच अधुन-मधुन पाऊस देखील पडत आहे. सुरुवातीला ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. 


हेही वाचा व पहा - Video: गांभीर्य नसणाऱ्यांना मिळाला काठीचा प्रसाद


शेतकरी, फळबागायतदार धास्तावले
आता ही पिके काढणीला आली असता मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस पडू लागला आहे. तसेच काही भागात गारपीट देखील झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासोबतच वाऱ्यामुळे फळबागा मोडून पडल्या आहेत. हा पाऊस थांबताच आता पुन्हा पावसाचा इशारा आला आहे. त्यामुळे शेतकरी, फळबागायतदार धास्तावले आहेत. मराठवाड्यात पुढील पाच दिवसात वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे, तसेच सोबत विजांचा कडकडाट राहणार आहे. ता.२५ मार्च काही भागात गारपीट होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अन्य दिवसात पाऊस राहील, अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाने दिली आहे.

या कडे द्या लक्ष
गारपीट व वाऱ्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील काढणीला आलेली पिके शक्य होईल तेवढ्या वेगाने काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे, काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावी, पशु धनाला देखील सुरक्षित स्थळी हलवावे. विजांची शक्यता असल्याने जपून राहावे, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.