मुंबई इंडियन्सकडून मराठवाड्याचा दिग्विजय देशमुख खेळणार ‘आयपीएल’

शिवकुमार निर्मळे
Saturday, 19 September 2020

मराठवाड्यात गुणवान खेळाडूंची कमतरता नाही. यापैकीच बीड जिल्ह्यातील क्रिकेटपटू दिग्विजय देशमुख इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळणार आहे.

अंबाजोगाई (जि.बीड) : आज शनिवारपासून (ता.१९) इंडियन प्रिमियर लीगला (आयपीएल) सुरवात होत आहे. आयपीएल दहा नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. अंबाजोगाई येथील क्रिकेटपटू दिग्विजय देशमुखला या स्पर्धेत चमकण्याची संधी मिळाली आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. या संघात दिग्गजांचा समावेश आहे. त्यामुळे दिग्विजयला मिळालेल्या संधीचे कौतुक होत आहे.

मूळचा वरपगाव (ता. अंबाजोगाई) येथील २१ वर्षीय दिग्विजय फलंदाज, गोलंदाज आहे. मागील हंगामात त्याने महाराष्ट्राकडून पदार्पण केले होते. जम्मू-काश्मीरविरोधात खेळताना त्याने ६१ धावा केल्या होत्या. प्रथम श्रेणीचा एक सामना आणि टी-२० च्या लढती तो खेळला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत चांगल्या धावा करून त्याने १५ बळी घेतले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या लिलाव प्रक्रियेत मुंबई इंडियन्सने दिग्विजयला वीस लाखांच्या बेस प्राईजवर घेतले.

‘एमपीएससी’च्या स्पर्धकांची संख्या पाच लाखांहून पंचवीस लाख,पासष्ट हजार पदांसाठी...

अभिनयातही चमक
दिग्विजयचे वडील शिक्षक आहेत. दिग्विजयने क्रिकेटपटू व्हावे म्हणून वडिलांनी त्याला एका क्लबमध्ये दाखल केले. मुंबईत १४ वर्षांखालील गटाच्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना त्याला चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा झाली. छोट्याशा दिग्विजयने होकार देत ‘कायी पो छे’मध्ये अली नावाच्या बालकलाकाराची भूमिका साकारली. अभिनय ही माझी पहिली आवड कधीच नव्हती. मला अनेक मालिका, चित्रपटांचे प्रस्ताव आले. ते नाकारले. क्रिकेटपटू व्हायचे होते. त्यासाठी घरच्यांनी पाठिंबा दिल्याचे तो सांगतो. राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची जडणघडण झाली.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada's Digvijay Deshmukh Play For Mumbai Indians In IPL