बाजारपेठेत मंदी; ऑनलाइनचाही फटका

file photo
file photo

औरंगाबाद : नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे; परंतु दोन दिवसांवर आलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणावर मंदीचे सावट आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरही दुकानांमध्ये अपेक्षित गर्दी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, तरुणाई ऑनलाइन खरेदीवर भर देत असल्याने त्याचा फटकाही दुकानदारांना बसला आहे. असे असताना दसऱ्याच्या दिवशी उलाढाल वाढू शकते, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करीत आहेत. 


दरवर्षी दसऱ्याच्या काळात रिअल इस्टेट, वाहन, सराफा, कापड, इलेक्‍ट्रॉनिक्‍स बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. यंदा देशात मंदीचे सावट असल्याने अनेक उद्योगक्षेत्र संकटात सापडली आहेत. मंदीमुळे बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना दिवाळीला मिळणारा बोनसही यंदा मिळतो की नाही याची भीती नोकरदारांना आहे. मंदीच्या लाटेत आपली नोकरी टिकवण्याला प्राधान्य देत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम व्यापारावर होणार आहे हे निश्‍चित. दसरा व दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेतील चैतन्य हरवले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या व्यापारी, कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खास ऑफरही देण्यात आल्या आहेत. 

सराफा बाजार 
सोन्याचे दर गगनाला भिडलेले असून, ते प्रतितोळा 39 हजारांवर पोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांना खरेदी करणे अशक्‍य बनले. त्यामुळे आधीच काळवंडलेला सराफा बाजारात मोठी उलाढालीची अपेक्षाच नसल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. 

इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केट 
इलेक्‍ट्रॉनिक्‍स मार्केटसाठी यंदा दसरा फारसा चांगला नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. ग्राहक ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू खरेदी करीत असल्याने याचा फटका स्थानिक वितरकांना सोसावा लागत आहे. मंदीमुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बाजारपेठेत उठाव दिसून आला नाही. 

ऑटोमोबाईल सेक्‍टर 
मंदीचा सर्वाधिक फटका हा ऑटोमोबाईल व्यवसायाला बसला आहे. दरवर्षी नवरात्र आणि दसऱ्याच्या काळात वाहनांची चांगली विक्री होते. यंदा दोन हजारांवर वाहनांची विक्री अपेक्षित आहे. मंदीमुळे अनेक वाहन कंपन्यांकडून आपल्या वाहनांवर भरघोस सूट दिली जात आहे. दरवर्षी दसऱ्यानिमित्त शेकडो वाहनांचे अडव्हान्स बुकिंग होत असते. त्यातही घट झाली आहे. त्यामुळे यंदा वाहन मार्केटमध्ये 30 ते 40 टक्के तूट होईल. दरवर्षी होणारी तीन ते साडेतीन हजार दुचाकी वाहनांची विक्री आता दीड ते दोन हजारांवर आली आहे. चारचाकी वाहनांची स्थिती यापेक्षाही बिकट आहे. 

दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये उत्साह आहे. दोन दिवसांपासून ग्राहकांची गर्दी होण्यास सुरवात झाली आहे. ग्राहक चौकशी करतात आणि दसऱ्याच्या दिवशी खरेदी करतात. ग्राहक ओळखीच्या दुकानामध्ये जाऊनच खरेदीला प्राधान्य देत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम दिल्या आहेत. त्यामुळे चांगली उलाढाल होईल असे वाटते. 
- अरुण जाधव, अध्यक्ष, टीव्ही डिलर असोसिएशन औरंगाबाद 


देशात मंदीचे सावट आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी युद्धासह बॅंकांकडून मोठ्या प्रमाणात होत असलेली सोन्याच्या खरेदीमुळे सोन्याच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला. 32 हजारांवरून सोने 40 हजारापर्यंत पोचले. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदी करणे अवघड झाले आहे. दसऱ्यामुळे सराफा बाजाराची मरगळ दूर होऊन झळाळी मिळावी अशी आशा आहे. 
- राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, औरंगाबाद. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com