परभणीकरांना दिलासा : आजपासून निर्धारीत वेळेत बाजारपेठ सुरू

कैलास चव्हाण
रविवार, 31 मे 2020

कंटेनमेंट झोनमधील दुकाने वगळली; जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली परवानगी

परभणी : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पाचव्या लॉकडाउन काळात परभणी जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली आस्थापने सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत सर्शत उघडण्यास जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी परभणी यांनी परवानगी दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दुपारी ते तीन सात वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. यात कंटेनमेंट झोनमधील दुकाने वगळण्यात आली आहेत.

लॉकडाउनमुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील बाजारपेठ बंद आहे. मे महिन्यात परभणीच्या शेजारील काही जिल्ह्यांत नियम व अटी लावत दिवस ठरवून बाजारपेठ उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, परभणीत किराणा व अत्यावश्यक सेवा वगळता अन्य अस्थापना सुरू करण्यास परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे पाचव्या लॉकडाउनमध्ये काय सुरू राहणार याची प्रतीक्षा लागली होती. त्यानुसार रविवारी (ता. ३१) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आदेश काढत अस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाउन लागू झाल्यापासून आतापर्यंत न उघडलेल्या आस्थापनांना पाचव्या लॉकडाउनमध्ये दिलासा मिळणार असून आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास हातभार लागणार आहे.

हेही वाचा : धक्कादायक ...! उघड्या वाहनातून रक्ताची वाहतुक -

लग्नसमारंभास ५० व्यक्तींना परवानगी
मोजक्याच नातेवाइककांच्या उपस्थिती होणाऱ्या लग्नसोहळ्यातील नातेवाइकांच्या संख्येत मर्यादेत वाढ करण्यात आली असून ५० व्यक्ती उपस्थित राहू शकणार आहेत. तसेच अंत्यविधीस ५० लोक उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. क्रीडा संकुले, मैदाने, सार्वजनिक ठिकाणी शारीरिक अंतर ठेवून वैयक्तिक व्यायाम, सराव करण्यास परवानगी मिळाली असून समूह, प्रेक्षक जमा होतील असे क्रीडा प्रकार करता येणार नाहीत. तीन चाकी, चार चाकी वाहनातून एक चालक व दोन प्रवासी यांना प्रवासाला मुभा दिली आहे. नियम पाळून ५० टक्के क्षमतेने बस वाहतूक सुरू करण्यास सूट दिली आहे.

हेही वाचा : परभणीत स्वॅब तपासणारी प्रयोगशाळा बंद; कारण गुलदस्त्यात

असे आहे बाजारपेठेचे वेळापत्रक
- सोमवार, मंगळवार, बुधवार (सकाळी सात ते तीन) कपडे, रेडीमेड कपडे, टेलर्स, घड्याळ, सराफ, बेल्टिंग, बॅग्स, इमिटेशन ज्वेलरी, पुस्तके, सायकल, स्टील ट्रेडर्स, सिमेंट, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, फुटवेअर, प्लायवूड, उर्वरित आस्थापना.
- गुरुवार, शुक्रवार, शनिवार (सकाळी सात ते तीन) - इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर्स, मोबाइल, टायर्स, बॅटरी, अ‍ॅटोमोबाइल्स, भांडी, स्टेशनरी, कटलरी, जनरल स्टोअर्स, प्लॅस्टिक, स्टेशनरी, रस्सी, क्रॉकरी, गिफ्ट आर्टिकल्स, फर्निचर.
- आठवड्यातील सर्व दिवस (सकाळी सात ते तीन) - शेतीविषयक बी-बियाणे, औषधी, किराणा, खाद्यपदार्थ विक्री (स्वीट मार्ट, बेकरी, फास्ट फूड इतर), दूध विक्री (रविवारी सकाळी सात ते दोन या वेळेतच करता येईल), खासगी आस्थापना (सीए कार्यालय, विधिज्ञ कार्यालय आदी), आॅप्टिकल स्टोअर्स, कापूस खरेदी - विक्री केंद्र
- आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस (सकाळी सात ते तीन)- टीव्ही, फ्रीज व एसी व इतर मेकॅनिक फक्त घरी जाऊन दुरुस्ती करणे, दुरुस्ती करणारे व सेवा देणारे करणारे, सलून सेवा फक्त घरी जाऊन.
- आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस (वेळेचे बंधन नाही) -हॉस्पिटल, मेडिकल, आरोग्यविषयक सेवा.
- आठवड्यातील रविवारसह सर्व दिवस (सर्वसाधारण अनुज्ञेय वेळेनुसार) - लॉन्ड्री (हॉस्पिटलमधील कपड्यांसाठी व इतर), पेट्रोलपंप, वृत्तपत्र मुद्रण व विक्री, हायवेवरील गॅरेज / अ‍ॅटोमोबाइल्स, तसेच अधिकृत सर्विस सेंटरमधील वाहनांच्या व्यवहारसंबंधी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण करण्याचे कामकाज, इतर सर्व अत्यावश्यक सेवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The market starts at the scheduled time from today Parbhani News