‘कोरोना’च्या सावटाखालील लग्नाची अशी ही गोष्ट...!

अनिल कदम
Friday, 17 April 2020


सोशल डिस्टन्सची लक्ष्मण रेषा पाळत काढलेला मुहूर्त, ठरलेली वेळ यानुसारही कन्यादान करता येते हे खानापुरातील एका लग्नाच्या गोष्टीवरून दिसून आले. जल्लोषात लग्न करता येणार नसल्याने काही काळ हिरमोडही झाला. लग्नावर होणारा खर्च टाळल्याने त्यातून बचत झालेल्या रकमेतून गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेत इंगळे व हिवराळे परिवाराने सामाजिकतेचे भान जपत कोरोनाच्या सावटाखाली लग्नाच्या निमित्ताने कोरोना विरोधी लढण्याचा निर्धारही बोलून दाखविला.

देगलूर, (जि. नांदेड) ः संपूर्ण जगाला कोराेना महामारीने ग्रासले असताना भारतीय विवाह संस्कृतीला हा विषाणू धक्का लावू शकला नाही. सोशल डिस्टन्सची लक्ष्मण रेषा पाळत काढलेला मुहूर्त, ठरलेली वेळ यानुसारही कन्यादान करता येते हे खानापुरातील एका लग्नाच्या गोष्टीवरून दिसून आले. जल्लोषात लग्न करता येणार नसल्याने काही काळ हिरमोडही झाला. लग्नावर होणारा खर्च टाळल्याने त्यातून बचत झालेल्या रकमेतून गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेत इंगळे व हिवराळे परिवाराने सामाजिकतेचे भान जपत कोरोनाच्या सावटाखाली लग्नाच्या निमित्ताने कोरोना विरोधी लढण्याचा निर्धारही बोलून दाखविला.

 

लग्नाची जय्यत तयारीही चालवली होती
खानापूर ग्रामपंचायतीचे सदस्य माधवराव इंगळे यांची एकुलती एक कन्या पूजाचा वाढनिश्‍चय मुखेड तालुका जांभळी येथील आनंदराव हिवराळे यांच्या गणेश या मुलाशी कोराेनाची चाहूल जगाला लागण्यापूर्वीच झाला होता. (ता. १५) एप्रिल २०२० रोजी दुपारी बारा एक वाजता विवाहाचा मुहूर्तही त्या वेळीच ठरविला गेला होता. मुहूर्ताची घटिका भरण्यापूर्वीच कोरोनाचे आक्रमण वाढत गेले, पंतप्रधानांनी जाहीर केलेला लॉकडाउन संपल्यानंतर विवाह मुहूर्त असल्याने वर व वधूचे पिता निर्धास्त होते. इकडे विवाहाच्या पत्रिका व इतर तयारीसाठी खानापूरच्या जगदंब ग्रुप, देवा ग्रुप, बसव ग्रुप, कृष्णा मित्रमंडळाने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून सोशल डिस्टन्स पाळत लग्नाची जय्यत तयारीही चालवली होती.

 

हेही वाचा -  १७ वर्षीय मुलीची आत्महत्या

 

मात्र, वरचेवर कोरोनाचे संकट गडद व्हायला लागल्याने पंतप्रधानांनी लॉकडाउनची मुदत तीन मेपर्यंत वाढवली. वधू पित्याने ग्रामस्तरीय कोरोना समितीच्या समन्वयातून ठरलेल्या मुहूर्तालाच शासनाच्या नियमांचे पालन करीत कन्यादान करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (ता. १५) पूजा व गणेश हे अवघ्या अकरा वऱ्हाडींच्या उपस्थितीत घरातील तुळशी वृंदावनाच्या साक्षीने विवाहबद्ध होत ‘गो...कोराेना, कोराेना गो...’ असा संदेशही दिला. वरासह आलेले माता-पिता व मामांनी वधू परिवाराकडील आदरतिथ्य स्वीकारीत आलेल्या वाहनासह लागलीच जांभळी (ता. मुखेड)कडे रवानाही झाले. या वेळी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेला वधूचा भाऊ अभिजितने लावलेली ‘बहीण निघाली सासरला’ ही धून ऐकताच उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.!
 

 

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करीत एकुलत्या एक कन्येचे कन्यादान केले. या महामारी संकटामुळे अनेकांपुढे अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. मी माझ्या परीने यामध्ये खारीचा वाटा उचलण्याचे मनोमन ठरविले आहे.
- माधव एकनाथ इंगळे, वधू पिता, खानापूर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married to observe social distance, nanded news