लातूर जिल्ह्य़ातील मारूती महाराज साखर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात

गौस शेख 
Tuesday, 15 December 2020

या भागातील वाढता ऊस पाहता हा साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधूनही होतीच.

बेलकुंड (लातूर) : गेल्या सहा वर्षांपासून थकित कर्जापोटी बंद असलेल्या बेलकुंड (ता.औसा) येथील संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्यावरील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जाचे पूर्णगठन करून हा साखर कारखाना विद्यमान संचालक मंडळाच्या ताब्यात सोमवारी देण्यात आला आहे.

हे ही वाचा : सरपंच आरक्षण सोडत लांबणीवर ;गावपुढाऱ्यांचा हिरमोड

मारूती महाराज कारखान्याला शासनाने सात कोटींची थकहमी दिल्यानंतर पालकमंत्री अमीत देशमुख यांच्या ताब्यातील हा साखर कारखाना सुरू होण्याची चिन्हे दिसत होते. या भागातील वाढता ऊस पाहता हा साखर कारखाना सुरू करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधूनही होतीच. यानंतर हा साखर कारखाना सुरू करू, असे वारंवार पालकमंत्री अमीत देशमुख व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे सांगितले जात असताना लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १४ कोटी रुपयांच्या कर्जाचे पूर्णगठन करून हा कारखाना सुरू करण्यासाठी सोमवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल सरव्यवस्थापक उगीले व सचिन देशमुख यांनी याबाबतचे अधिकृत पत्र व चाव्या मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, मांजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, मारूती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्याम भोसले, व संचालक मंडळाकडे सुपूर्द केली. 

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात तीस हजारांवर शेतकरी पीक कर्जमाफीच्या प्रतिक्षेत

सदरील जिल्हा बँकेच्या कर्जाची परतफेड नऊ वर्षांसाठी असून या मध्ये पहिल्या दोन वर्षांसाठी हप्ता भरण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मारूती महाराज साखर कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग मोकळा झाला असून आता लवकरच हा कारखाना सुरू करण्याच्या कामाला गती मिळणार आहे.

हा कारखाना सुरू करण्यासाठी शासन स्तरावर थक हामी मिळवून देण्यासाठी पालकमंत्री अमीत देशमुख यांनी प्रयत्न केले असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कर्जाचे पुर्णगठन करित कारखाना सुरू करण्याच्या कामाला अधिक गती दिली, अशी प्रतिक्रिया श्रीशैल उटगे यांनी दिली.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maruti Maharaj Sugar Factory in Latur district has been handed over to the Board of Directors