मावशी होत चालली, मायच पाहिजे मराठी...

नवनाथ येवले
Saturday, 29 February 2020

कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेतर्फे डॉ. ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ना. ग. भालेराव हायस्कूल स्नेहनगर येथे मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य देविदास फुलारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नांदेड : ‘मावशी होत चालली, मायच पाहिजे मराठी, ध्यास असावी मराठी, श्वास असावी मराठी’ कवी मारोती मुंडे यांच्या या कवितेच्या ओळी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना अधिकच भावल्या, त्या मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने आयोजित कवी संमेलनात. कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरवदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदेड शाखेतर्फे डॉ. ज्योती कदम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. ना. ग. भालेराव हायस्कूल स्नेहनगर येथे मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य देविदास फुलारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे शाळेत आयोजन केलेले असल्याने बहुतेक कवींनी बालकविता सादर केल्या. त्यात विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेले ते नरेंद्र घोंगडे यांचे बालगीत. पाऊस आला... पाऊस आला... चला भिजायाला... काही म्हणा पण मुलांनो खुशाल तुम्ही भिजा... या सादर केलेल्या या गीताने उपस्थिांची मने जिंकली. तर माधव चुकेवाड यांनी फार फार वर्षापूर्वी... ही कथा आपल्या बालकवितेद्वारे सादर करून गंमत निर्माण केली. या देशाची पवित्र माती, पिकविते माणिक मोती, मातीलाही सोने करते अशी आहे तिच्यात अफाट शक्ती, अशी मातृभूमीच्या मातीची थोरवी गाणारी कविता उषा ठाकूर यांनी सादर केली. तर लक्ष्मी पुरणशेट्टीवार यांनी जीवनात झालेल्या उपेक्षेची सल सांगतांना जीवनात नव्याने उभारी घेण्याची इर्षा जागवणारी ही कविता सादर केली.

हेही वाचा - ‘त्या’ ३२ शिक्षकांना जावे लागणार ...कोठे ते वाचा...

बापाचा आणि शेतीचा जिव्हाळा
पदोपदी सदा माझी उपेक्षा आणि वंचना वाटते क्षणात सर्वकाही धुवावे पुसून टाकावे नव्याने रुजावे.... अंकुरावे जगून आनंद घ्यावे फक्त दुसऱ्यांना देण्यासाठी... तर महेश मोरे यांनी माय वाकलिया कष्टून वावरी, खुळा झाला बापू राबून शिवारी या शब्दात शेतकरी, कष्टकरी आई-वडिलांची व्यथा मांडणारी कविता सादर केली. याच धर्तीवरची कविता नारायण पारेकर यांनी सादर करून ‘शेताच्या मातीतील कणाकणात बाबा तुमचा आत्मा दिसतो, काळ्याभोर शेतात तुमच्या घामाचा दाम कळतो’ असा बापाचा आणि शेताचा जिव्हाळा आणि संघर्ष आधोरेखित केला.

येथे क्लिक करासावधान ८० देशातील १२ कोटी लोकांना या रोगाची लागण

चिवड्याची बाल कविता
कवी एकनाथ डुमणे यांनी मुरमुऱ्याच्या चिवड्याची बालकविता सादर करून कवी संमेलनाला आणखीनच चवदार केले. गांधीजींची अजूनही देशाला गरज आहे, अशा आशयाची सदानंद सपकाळ यांची कविताही रसिकांना आवडून गेली. याशिवाय विठ्ठल गिरडे, सतीश शिरसाठ, बालिका बनकर, राम शेळके, सचिन गायकवाड यांनीही आपल्या कविता सादर केल्या. अध्यक्षीय समारोप डॉ. ज्योती कदम यांनी ‘चिऊताई’ या बालकवितेने केला. प्रभाकर कानडखेडकर यांनी प्रास्ताविक केले तर अशोक कुबडे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिगंबर कदम यांच्या आभारप्रदर्शनानंतर कवी संमेलनाची सांगता झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mashi is Happening, I Want Marathi, Nanded News