esakal | Video : सामना भीतीचा, डॉ. मुलमुले यांचे अनुभवकथन त्यांच्याच शब्दात 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

ज्ञान आम्हाला सांगतं की या शत्रूची वाहने दोन असतात, ती म्हणजे  श्वास आणि स्पर्श. या दोन वाहनांवर बसून तो आमच्यापर्यंत पोहचू शकतो. आम्ही सतत मास्क घातला आणि सामाजिक अंतरे राखली तर तो आमच्यापर्यंत पोहचू शकणार नाही.

Video : सामना भीतीचा, डॉ. मुलमुले यांचे अनुभवकथन त्यांच्याच शब्दात 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : भीती ही सर्वसामान्य भावना आहे. माणूस जन्माला येतो तोच मुळी आहार, निद्रा, मैथुन आणि भय या मुलभूत प्रेरणा घेऊन. कारण भय हे आमचं संरक्षक कवच आहे. भय आम्हाला संकटांप्रती सतर्क करतं, सावध करतं, सजग करत, आणि सक्षमही करत. मात्र कधी कधी संकटाला घाबरून जाऊन आमचं मन ओव्हर रिअॅक्ट करतं. अशा वेळी, मूळ संकटापेक्षा जास्त नुकसान भयाच्या या भावनेने होते. आवश्‍यक आणि अनाठायी अशा दोन प्रकारचे भय असतात. 
 
प्रश्न अनाठायी भयाचा
हे अनाठायी भय एकतर disproportionate म्हणजे प्रमाणाबाहेर असतं, किंवा inappropriate म्हणजे असंयुक्तिक ठरतं. दोन्हीही मनस्थितीला हानिकारक. हे अनाठायी भय कसं नियंत्रणात ठेवता येईल? या भयाविरुद्ध आमचं पाहिलं अस्त्र आहे ज्ञान. संकटाविषयीचं तथ्याधारित ज्ञान, जे शासकीय यंत्रणा आमच्यापर्यंत पोचवते आहे. ज्ञान आम्हाला विवेकी करतं, आणि विवेक आमची अनाठायी भीती घालवतं. अंधारात आम्ही दोरीला साप समजून घाबरतो, मात्र प्रकाशात तो साप नाही हे लक्षात आल्यावर आमचं भय पळून जातं.  

त्याची प्रवेशद्वारे तीन, डोळे, नाक, आणि तोंड. आम्ही जर वारंवार हात धुतले आणि त्याशिवाय चेहऱ्याला स्पर्श टाळला तर त्याचा तोही मार्ग बंद होईल.  भयाविरुद्ध दुसरं अस्त्र आहे सारासार बुद्धीचं. आम्ही जर सांख्यिकी विचार केला तर लक्षात येईल की हा शत्रू फक्त दोन टक्के लोकांना जीवघेणा ठरतो. वेगळ्या शब्दात सांगायचं तर ९८ टक्के लोकांना काहीही होत नाही. मग मी दोन टक्क्यातच असेन असा विचार का करायचा?

मनःस्थिती बदलो
तिसरं अस्त्र व्यग्रतेचं. कुठलीही गोष्ट चांगली की वाईट हे आमचा दृष्टीकोन ठरवतं. बूट बनवणाऱ्या दोन ब्रिटिश कंपन्या जेव्हा पहिल्यांदा आफ्रिकेत पोचल्या, तेव्हा पहिल्या कंपनीच्या सुस्त एजंटने मालकाला कळवले, येथे कुणीही बूट घालत नाही, माल पाठवू नका. दुसऱ्या कंपनीच्या उत्साही एजंटने मालकाला कळवले, येथे कुणाच्याही पायात बूट नाही, त्वरित सगळा माल पाठवा! आम्ही घरात बंदिस्त आहोत ही सक्ती की संधी, हे आमच्या दृष्टीकोनानुसार ठरते. म्हणतात ना, 'अगर परिस्थिती नही बदल सकते तो मनस्थिती बदलो!' 

हेही वाचा - ‘कोरोना’चा नांदेड जिल्ह्याला सध्या तरी दिलासा...

तोवर मी प्रख्यात डॉक्टर झालो होतो
घरात बसून करण्यासारखी अनेक कामे, जसे साफसफाई, कागदपत्रांचे संकलन, आमचे प्रलंबित छंद, आप्तस्वकीय, मित्र नातेवाईकांची ख्यालीखुशाली विचारणे, अशा गोष्टी करता येतील. चित्रकला, गाणे, वाद्यवादन अशा कला कधीकाळी अवगत करण्याचा प्रयत्न केला असेल, तर तो पुन्हा सुरु करता येईल. माझा एक डॉक्टर मित्र नेहमी टेबलावर ठेका धरत असतो. मला तबलावादकच व्हायचं होतं रे, असे म्हणतो. मग का नाही झालास? असं विचारल्यावर तो म्हणाला, तोवर फार उशीर झाला होता. उशीर कसला? तर तो गंभीरपणे म्हणाला, तोवर मी प्रख्यात डॉक्टर झालो होतो!

मनाचे कोपरेही उजळतात
घरात करायची अनेक कामे असतात, त्यात शोकेस साफ करणे कायम प्रलंबित ठेवले असते असा माझा अनुभव. हौसेने आणलेल्या वस्तूंवर धूळ चढलेली असते. त्या घासून पुसून ठेवण्यात अपार आनंद असतोच, पण अशी शारीर व्यग्रता भीतीच्या भावनेला मनात थारा देत नाही. धूळ पुसल्याने फक्त त्या वस्तूच उजळत नाहीत, तुमच्या मनाचे कोपरेही उजळतात. प्रसिद्ध शायर निदा फाजली म्हणतात की, ‘अपना गम लेकर कही और न जाया जाय, घर मे बिखरी हुई चीजे सजायी जाय, घर से मस्जिद तो बहोत दूर है चलो यू करले, किसी रोते हुये बच्चे को हसाया जाय’.

येथे क्लिक कराच - Video : डॉ. मुलमुले यांचे विलगीकरणातील दिवस त्यांच्याच शब्दात

हे रडणारं मूल तुमच्या मनाचं. त्याला हसवा! 
मित्रहो, लक्षात असू द्या, तुमची परिस्थिती खूप चांगली आहे. असे अनेक कष्टकरी बांधव आहेत, ज्याचं हातावर पोट आहे. एनजीओ आणि शासनाच्या मदतीने ते हे संकट पार करीत आहेत, तर तुम्हा-आम्हाला भीतीचा हक्कही नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भीती संकटापेक्षा अधिक असते अनिश्चिततेची. उद्या काय होईल, आपली दैनंदिनी पुन्हा सुरळीत होईल का? विश्वास बाळगा, हेही दिवस जातील. निसर्गाचे हे चक्र आहे. निसर्गाने एक आम्हाला निवांतपणाची एक संधी दिली आहे. खूप काही शिकवलं आहे. काय लागतं आनंदाने जगण्यासाठी? फार थोड्या गोष्टी.

हे देखील वाचाच - लॉकडाऊनचा परिणाम : नांदेड विभागातील ‘एसटी’चे तीन हजार कर्मचारी पगाराच्या प्रतीक्षेत

हेही दिवस जातील
‘सफर का मजा लेना हो तो साथ मे सामान कम रखिये, और जिंदगी का मजा लेना हो तो दिल मे अरमान कम रखिये!’ हे जग सगळ्याचं आहे. पशु, पक्षी, नद्या, सागर, पर्वत शिखरे, ‘जिंदगी पे सबका एक सा हक है सब तस्लीम करेंगे, सारी खुशिया सारे दर्द बराबर हम तक्सिम करेंगे..’ हेही दिवस जातील. ते भयात घालवू नका, चवीने जगण्यात घालवा. काळजी करू नका, काळजी घ्या. रोजचा एक दिवस जगा. फार पुढचा विचार करू नका, सूर्यही रोज उगवतो, मावळतो, पुन्हा उगवण्यासाठी...